इंदापूर : ‘बाळुमामाच्या नावाने चांगभले’ या मालिकेतील ‘रघु’च्या पात्रामुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेला इंदापूरचा भूमिपूत्र बाबा गायकवाड व सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला भुरळ पाडणारी गौतमी पाटील लवकरच ‘घुंगरू’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. शुक्रवारी (दि.३०) सकाळी इंदापूरात आल्यानंतर बाबा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, तमाशा कलावंतांचे जीवन, कलाकेंद्रातील वास्तवाचे चित्रण करण्याच्या उर्मीतून हा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपण या चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला भुरळ पाडणारी गौतमी पाटील नायिका म्हणून पदार्पण करत आहे. तमाशाचे वास्तव जगलेल्या व समर्थ अभिनेत्री म्हणून प्रख्यात असणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे या चित्रपटाद्वारे दीर्घ कालावधीनंतर अभिनय जगतात पुनरागमन होत आहे.
थायलंड, हम्पी, माढा, इंदापुरात होणार चित्रीकरण
चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संदीप डांगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खुद्द बाबा गायकवाड हेच या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. लेखनाची जबाबदारी तेच सांभाळत आहेत. सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण थायलंड, हम्पी, माढा, सोलापूर, मोडनिंब, इंदापूर येथे होणार आहे. मोडनिंब व माढा या ठिकाणी चित्रीकरणाचे १५ दिवसांचे दोन शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आहेत.
श्रीकृष्ण ठाकणे, ‘मुलगी झाली हो’ फेम शीतल गीते, प्रशांत तोतला, श्रीमंत ठाकणे, सुदाम केंद्रे, सुमीत मेरगळ, अर्जुन कांबळे, रणजित जाधव, वैभव गोरे, स्वप्नील पाटील, रोशनी कदम, सानिका भगत आदी मालिकांमधून परिचित झालेल्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर येण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळत आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
बाबा गायकवाड भरणेवाडीचे रहिवासी
बाबा गायकवाड हे तालुक्यातील भरणेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी राजकारण समाजकारणाबरोबर अभिनयाची आपली आवड जोपासली आहे. ‘बाळुमामाच्या नावाने चांगभले’ या मालिकेच्या बाराशे भागात त्यांनी रघुची भूमिका साकारली आहे. मध्यंतरी राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकीची संधी मिळावी यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने ते प्रकाशात आले होते.