पुणे : त्रिदल – पुणे , पुण्यभूषण फाऊंडेशनचा ३२ वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनीवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात देण्यात आला.
निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी केंदीय मंत्री प्रकाश जावडेकर,माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, डॉ. शां. ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, प्रतापराव पवार, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई , गजेंद्र पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
सैन्यात काम करताना जायबंदी झालेल्या ५ जवानांचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश ( काका ) धर्मावत यांनी आभार मानले.
नितीन गडकरी म्हणाले, ‘ आत्मनिर्भर भारत ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे. आत्मनिर्भर भारत करण्यासाठी औद्योगिक उत्पादन दुप्पट केले पाहिजे. निर्यात वाढवावी लागेल. उद्यमशील कतृत्वे सर्वांसमोर आली पाहिजे. उद्यमशीलता वाढली पाहिजे.औद्योगिक राष्ट्रवाद महत्वाचा असून बाबा कल्याणी त्याचे प्रतिक आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमुळे मोठी व्यापार पेठ निर्माण होणार आहे. पुणे -बंगळूरु महामार्गाच्या कामाला सुरवात होत असून साडेतीन तासाचा हा प्रवास असेल. नवे सॅटेलाईट पुणे या भागात निर्माण केले पाहिजे.
ऑटोमोबाईल इंडस्ट्री साडेसहा लाख कोटीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. युवा पिढी हुशार असून ती चांगले काम करीत आहे. उद्यमशीलतेला पोषक वातावरण पाहता पुणे जगाच्या नकाशावर आजच्या पेक्षा महत्वाचे शहर बनेल.
पुरस्कार, सन्मानाला उत्तर देताना बाबा कल्याणी म्हणाले, ‘ माझ्या कारकिर्दीला ५० वर्ष होत असताना पुण्यभूषण पुरस्कार मिळत असल्याचा आनंद आहे. पुण्यातील सर्व क्षेत्रातील पोषक वातावरणामुळे प्रगती झाली, हे विसरता येणार नाही.
उदारीकरण (लिबरलायझेशन ) नंतर उद्योगांची प्रगती झाली. निर्यात सुरू झाली. भारत फोर्जनेही या काळात प्रगती केली. प्रगत देशाच्या तंत्रज्ञानावर आपण थोडया अधिक मेहनतीने मात करू, हे आमच्या लक्षात आले. नवनवीन उत्पादन सुरू करणे म्हणजे नवनवीन प्रतिभा निर्मिती करणे होय.आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे देशाची प्रगती होणार आहे. भारतीय स्वातंत्रयाला शंभर वर्ष पूर्ण होताना देश जगातील पहिल्या तीन क्रमांकात असेल.
धातूशास्त्र (मेटलर्जी ) तंत्रात भारत जगात पुढे होता. ते सांगूनच आम्ही संरक्षण क्षेत्रातील उत्पादन खासगी क्षेत्राला खुले करण्याचा आग्रह सरकारच्या मेक इन इंडिया परिषदेत केला. त्याला परवानगी मिळाल्यानेच आधुनिक तोफा निर्मितीचे लक्ष्य साध्य केले. आत्मनिर्भर भारताचा आत्मा नितीन गडकरी आहेत. रस्ते उभारणीच्या कामाने देशाचे भविष्य उज्वल होणार आहे, असेही कल्याणी म्हणाले.
[read_also content=”समर्थ मंदिर परिसरातील पुलांच्या रुंदीकरणाला 50 लाख रुपयांचा निधी https://www.navarashtra.com/maharashtra/fund-of-rs-50-lakhs-for-widening-of-bridges-in-samarth-mandir-area-nrdm-288779.html”]
खा. गिरीश बापट म्हणाले, ‘ बाबा कल्याणी, नितीन गडकरी दोघेही क्रांतीकारक आहेत. बाबा कल्याणी उद्योगातील क्रांतीकारक, तर नितीन गडकरी हे रस्ते कामातील क्रांतीकारक आहेत. रोज ते नवनवीन काहीतरी करीत असतात.
डॉ. माशेलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. माशेलकर म्हणाले, ‘काळाच्या पुढचा विचार करुन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न कल्याणी यांनी अनेक दशकांपूर्वी साकार केले
खा. जावडेकर म्हणाले, ‘ बाबा कल्याणी यांच्यासारखे उद्योजक असतील तर भारताचा उद्योग व्यापार जगात पुन्हा बहरेल.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘ मराठी पाऊल पुढे पडत असताना कल्याणी यांच्या तीन पिढ्यांनी दाखवले.
प्रतापराव पवार म्हणाले, ‘ बाबा कल्याणी परिवाराशी आमचा जुना स्नेह आहे. भारत फोर्जने औद्योगिक प्रगतीचा, गुणवत्तेचा मानदंड उभा केला आहे.