जळगाव : संपूर्ण जगाला तत्वज्ञान पटवून देणाऱ्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) यांचे माहेर हे जळगाव (jalgoan)आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा गावामधील बहिणाबाईंच्या स्मृती जिवंत राहाव्यात, त्यांचा इतिहास आचार विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचावा, म्हणून २००८ मध्ये आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला मंजूरी मिळाली होती. या स्मारकाचं काही बांधकामही झालं आहे. परंतु, तब्बल १२ वर्ष उलटले हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. अनेक सरकार आली अन् जिल्ह्यात मंत्री झाले. मात्र, केवळ आश्वासनांचा पाऊस पडत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मारक पूर्ण झाले नाही.
या स्मारकाच्या जागेवर प्रचंड गवत वाढत आहे. स्मारक आणि त्या आजूबाजूचा परिसर हा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आसोदा हे बहिणाबाईचे माहेर गाव याच गावात बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला, याच गावात त्यांचे बालपण गेलं, आणि लग्न झाल्यानंतर त्या सासरी गेल्या. कालांतराने कवितांच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी या संपूर्ण जगापर्यत पोहचल्या. बहिणाबाईंच्या कविता या आजही मनाला भिडतात. केवळ कविता नाही, ज्या कविता बहिणाबाईंनी गायल्या, त्या कवितांमधून त्यांनी समाज परिस्थितीचे आयुष्यांच, जगण्याचं वास्तव मांडलं. जगभरात प्रसिध्द अशा बहिणाबाई चौधरी यांचा इतिहास कायम जपला जावा, म्हणून त्याचे माहेर म्हणजेच असोदा गावात बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक व्हावं, अशी गावकऱ्यांनी मागणी केली.
२००८ मध्ये या ठिकाणी स्मारकाला मंजुरी मिळाली, सभागृहासह कुंपन आणि भिंती असं बांधकाम झालं आहे. मात्र, कालांतराने हे काम रखडल. दहा वर्षापासून या स्मारकासाठी आसोदा येथील ग्रामस्थांचा लढा सुरु आहे. अनेक सरकारे बदलली, जिल्ह्याला मंत्रीपदेही मिळाली, मात्र मंत्र्यांकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात स्मारक मात्र पूर्ण झाले नाही. एक दोन नाही तब्बल १२ वर्ष उलटले मात्र, बहिणाबाई यांचे माहेर असलेल्या गावात त्यांचे स्मारक अजूनही होऊ शकलेले आहे, ही मोठी शोकांतिका आहे. संपूर्ण जगाला बहिणाबाई समजल्या. मात्र, लोकप्रतिनिधींना कशा कळल्या नाही? याची मोठी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाच्या कारभारावर तसेच लोकप्रतिनिधींवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आता सहनशक्ती आणि संयम संपला आहे, पुढच्या बहिणाबाईंच्या जयंतीपर्यंत जर स्मारकाचे काम पूर्ण झाले नाही, तर सर्व आसोदा गाव रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.