 
        
        सौजन्य - सोशल मिडीया
पुणे/सोनाजी गाढवे : दिक्षा संकेस्थळावरच्या आकडेवारीनुसार राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपैकी दररोज केवळ १ हजार १९५ विद्यार्थी क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल सामग्रीचा वापर करतात. या आकडेवारीमुळे शासनाचा डिजिटल शिक्षणाचा उपक्रम कितपत प्रभावी ठरतोय की नाही, यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये २०१६ पासून क्यूआर कोड समाविष्ट करण्यात आला आहे. जेणेकरून शिक्षण व्याप्ती व्हावी आणि डिजिटल साधनांचा वापर करता यावा. याचा समावेश विद्यार्थ्यांना प्रत्येक धडा आणि कवितेशी संबंधित डिजिटल संसाधनांपर्यंत पोहोचता येण्यासाठी केला आहे.
शिक्षण अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि बालभारतीतर्फे काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड समाविष्ट केले. या क्यूआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थी धड्यांशी संबंधित व्हिडिओ, प्रयोग, ऑडिओ आणि सराव प्रश्न पाहू शकतात. मात्र, या उपक्रमाचा प्रत्यक्षात किती वापर होतो, हा प्रश्न आजही कायम आहे.
शिक्षकांचे म्हणणे आहे की, अनेक विद्यार्थ्यांना क्यू आर कोड स्कॅन करण्याची प्रक्रिया माहित नसते. ग्रामीण भागात इंटरनेट व मोबाईलचा अभाव हा सर्वात मोठा अडथळा ठरतो. काही शाळांमध्ये शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना क्यूआर कोडचा वापर करून दाखवतात, तर काही ठिकाणी हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित राहतो. पुण्यातील एका शिक्षकाचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना क्यू आर कोड दाखवला की ते उत्सुकतेने स्कॅन करतात, पण घरी मोबाईल आणि डेटा नसल्याने नियमित वापर होत नाही.
बालभारती ने क्यूआर काेड कार्यान्वित करण्यापूर्वी पालक आणि शिक्षक व ग्रामीण भागातील मुलांना यांच्याकडे तांत्रीकदृष्ट्या कितपत ज्ञान आहे, याचा विचार करायला पाहिजे. नसेल तर त्यांच्यात जनजागृती करणे गरजेचे आहे. बालभारतीची वाटचाल डिजिटल क्रांतीकडे परंतु गुणवत्तेच्या नावाने कार्य शून्य आहे. – तुषार देशमुख, अध्यक्ष, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य
मोबाईल वापरताना राहा सजग
शिक्षण विभागाने क्यू आर कोडसारखे आधुनिक साधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून डिजिटल शिक्षणाचा पाया रचला आहे, परंतु त्याचा उपयोग व्हावा यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या त्रिसूत्रीने एकत्र येणे आवश्यक आहे. अन्यथा हा उपक्रम केवळ पुस्तकातील छापील क्यूआर कोड ठरू शकतो. क्यूआर कोड वापरताना काही दक्षता घेणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी फक्त बालभारती किंवा दीक्षा ॲपवरील अधिकृत किंवा कोडच वापरावा, तर शिक्षकांनी आधी त्या कंटेंटची तपासणी करावी. पालकांनी मुलांना मोबाईल वापरात सजग राहण्याचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी केले आहे.
बालभारतीच्या पुस्तकातील क्यूआर मध्ये खुप छान व्हिडीओ आहेत. डिजिटल संस्कार किंवा प्रथम नावाने युटूब चॅनेल आहेत. कोरोनाच्या काळात दिक्षा ॲपचा छान उपयोग झाला. आता पाहीला गेल तर प्रतेक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे. आता तर ती सुविधा खेड्यापाड्यात सुद्धा उपलब्ध आहे. पालक त्याकडे किती लक्ष घालतात ते संगता येणार नाही. सुशिक्षीत पालक नक्कीच याचा उपयोग करत असतील. शिक्षाकांना याची मुलभूत माहिती पाहिजे. पालकांत जागरुकता आणायला पाहिजे. -धनश्री चौगुले, शिक्षिका, पिंपरी चिंचवड महापालिका प्राथमिक शाळा






