सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जनतेच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक गाठला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या गर्दीची नोंद झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गटाला) मावळ विधानसभेची जागा मिळाली. विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या नावाची महायुतीतर्फे घोषणा झाल्याने सोमवारी वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यानुसार सोमवारी सकाळी वडगावमध्ये सकाळपासूनच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरुवात झाली होती.
ही रॅली वडगांव पंचायत समिती चौकात तहसिल कार्यालयाजवळ पोहोचताच अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सर्व पक्षीय नेत्यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळा भेगडे, रविंद्र भेगडे, गणेश भेगडे,भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट) चे वरिष्ठ सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजप महिला आघाडीप्रमुख सायली बोत्रे, सुलोचना आवारे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपस्थित होते.
बाळा भेगडेंची आमदार शेळकेंवर टीका
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार शेळकेंवर टीका केली. ते म्हणाले, की आमदार सुनील शेळके हे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या उमेदवारीला इतके घाबरले आहेत, की दोन दिवस भाजप नेते आणि माझे दैवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तळ ठोकून होते. मला तिथून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला. म्हणाले, बाळाभाऊ काय करताय ? मी म्हटलं साहेब ‘करेक्ट कार्यक्रम करतोय.’ यावर उपस्थितात प्रचंड हशा पिकला.’
सागर बंगल्यावर गेलो. दहाच मिनिटात आमदार शेळके माझ्या समोर येऊन ‘बाळाभाऊ कधी आलात, असं विचारताच ‘मी म्हटलं आताच आलोय’… म्हणाले मामा मला वाचवा. मला म्हटले फडणवीसांसोबत दोघांचा फोटो घेऊ. मी म्हटलं एकट्याला घ्यायचे तेवढे फोटो घे साहेबांसोबत.’ आणि तिथून बाहेर पडलो. सांगायचं एवढंच आहे, की गद्दारी तुमच्या रक्तात आहे, आमच्यात नाही. आम्हाला मावळची संस्कृती जपायची आहे. आमदार शेळके शहाणे असाल, तर अजितदादांकडे जाऊन माघार घ्या आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा द्या, असे उपरोधिक आवाहनही बाळाभाऊ भेगडे यांनी आमदार शेळके यांना केले.