बारामती – राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीला आणखी रंगत आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील नणंद भावजय यांच्यामध्येच थेट लढत होणार असल्याने सर्वांचे लक्ष बारामतीच्या निवडणूकीकडे लागले आहे. दरम्यान, बारामतीमध्ये एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शरद पवार गटाने याबाबत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
पसंतीक्रमानुसार ‘तुतारी’ चिन्ह
बारामती लोकसभा निवडणूकीसाठी एकूण 51 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या छाननीनंतर पाच अर्ज बाद होऊन 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीमध्ये आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे बारामतीमध्ये 38 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील शेख नामक उमेदवाराने पहिली पसंती ‘तुतारी’ या चिन्हाला दाखवली होती. त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांचा पहिला पसंतीक्रम ‘तुतारी’ होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार शेख यांना हे चिन्ह देण्यात आले. यामुळे शरद पवार गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
शरद पवार गटाकडून आक्षेप
शरद पवार गटाचे तुतारी वाजणारा माणूस असे निवडणूक चिन्ह आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळाले आहे. तुतारी चिन्हासह शरद पवार गटाची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून आपल्या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. घड्याळ आणि शरद पवार यांचे अनेक वर्षांचे समीकरण आता बदलले असल्यामुळे शरद पवार गटाला नवीन चिन्हाचा जोरदार प्रचार करावा लागत आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह शेख यांना देण्यात आले. त्यामुळे त्यामुळे शेख यांना देण्यात आलेल्या चिन्हावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे.