पुणे : तब्बल २५ वर्षे रखडलेला बारामती- फलटण- लोणंद रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे. फलटण- लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले असून, आता बारामती- फलटण रेल्वे मार्गाचे ७८ टक्के भूसंपादन पूर्ण झालेले आहे.
येत्या दोन वर्षात हा रेल्वे मार्ग उभारण्याचे उद्दिष्ट रेल्वेने नजरेसमोर ठेवून काम सुरु केले आहे. या रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी ३०० कोटी रुपयांच्या दोन, अशा ६०० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, पंधरवड्यात हे काम पूर्ण करण्यासाठी एजन्सी अंतिम होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
भूसंपादन वेगाने करण्याचा प्रयत्न
बारामती- फलटण- लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन १९९७-१९९८ च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरु व्हायला वीस वर्षांचा काळ निघून गेला. फलटण-लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती-फलटण हे भूसंपादन रखडले होते. आता मात्र रेल्वेच्या नियमानुसार बऱ्यापैकी भूसंपादन संपलेले असून, उर्वरित भूसंपादन वेगाने करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा प्रयत्न आहे.
एक वर्षाचा कालावधी लागणार
या कामाला आणखी उशीर होऊ नये, यासाठी रेल्वेने जागा ताब्यात घेऊन तेथे मुरुमीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेत निविदा प्रसिद्ध केली आहे. साधारण एक वर्षात मुरुमीकरणाचे व त्यानंतर प्रत्यक्ष स्थानक उभारणी व रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. डिसेंबर २०२५पर्यंत हे काम संपविण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल.
वेळ व अंतराची होईल बचत
सध्या बंगळूर मार्गावर जाण्यासाठी पुणे ते लोणंद व दौंड ते पुणे असे तब्बल १६६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. बारामती- फलटण- लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर हेच अंतर १०४ किलोमीटर इतके कमी होईल. याचाच अर्थ ६२ किलोमीटर अंतर कमी होऊन वेळ, इंधन यांची बचत होईल. इंजिनची दिशा बदलण्याची गरज भासणार नाही.
कसा असेल रेल्वे मार्ग?
– चार मोठे पूल, २६ मेजर पूल, २३ मायनर पूल व ७ आरओबी असतील
– नीरा व कऱ्हा नदी, नीरा डावा कालव्यावर पूल उभारले जातील
– न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे अशी तीन रेल्वे स्थानके या मार्गावर नव्याने उभारली जातील
– पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वेमार्ग टाकला जाईल. तो विद्युतीकरणासह सुरू होईल.