रत्नागिरी: गेल्या पाच दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात (Barsu Refinery Project) आंदोलन सुरु आहे. आज अखेर बारसूतील आंदोनल तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. तीन दिवसांमध्ये चर्चा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान चर्चेसाठी प्रशासन बारसूमध्ये दाखल झालं आहे. जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी आले आहेत. मात्र आंदोलकांनी चर्चेवर बहिष्कार टाकल्याचं दिसत आहे. जिल्हाधिकारी बोलत असताना आंदोलक निघून गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आम्ही चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट
रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) बारसूमध्ये (Barsu) वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं होतं. बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आज सकाळीही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते. अशातच काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर मग वातावरण निवळलं.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
रिफायनरी विरोधातील आंदोलनावर सध्या विरोधक ठाम आहेत. फक्त तीन दिवसात प्रशासनाने नीट चर्चा करावी, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. आज बारसूसाठी माती परीक्षण केलं जाणार होतं. त्यामुळे आंदोलकांच्या आंदोलनाची धार वाढली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र उभे राहिलं आहे. आता तीन दिवसांनंतर चर्चेतून बारसू प्रकल्पाच्या विषयावर तोडगा निघणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.