Photo Credit- Social Media
बीड: बीड पोलिस दलातील सायबर गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस अप अधिक्षक रणजित कासले गेल्या दोन-तीन दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांमुळे बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. असा दावा कासले यांनी केला होता. तसेच वाल्मिक कराड मुंडेंनी केलेल्या गुन्ह्यांची अंडी पिल्ली बाहेर काढणार होता, म्हणून धनंजय मुंडेंनीच कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती. असा दावा कासलेंनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता रणजित कासलेंनी पुन्हा एक व्हिडीओ शेअर करत आपण बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हटले आहे रणजित कासले यांनी?
“सगळ्यांना रामकृष्ण हरी मित्रांनो, कालपर्यंत मी काही व्हिडीओ शेअर केले. त्यानतंरही मी माझ्या काही पत्रकार, वकील आणि माझ्या काही पोलिस मित्रांशी चर्चा केली. त्या सर्व मित्रांनी मला लपून राहून असे व्हिडीओ शेअर करणं योग्य नाही, असा सल्ला दिला. त्यानंतर आता मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत सर्व संकटांचा धैर्याने सामना केला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं कासलेंनी म्हटलं आहे.
तसेच, ‘व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जास्त दिवस लढता येत नाही. हे मला जाणवलं आहे. मी मोबाईल चालू करणार आहे. मी ज्या ज्या लोकांवर आरोप केले आहेत. ते आता भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत.धनंजय मुंडे भाजपच्या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर पडणार आहेत. पण यात बळी तर माझाच जाणार आहे. माझ्याविरूद्धच गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे आता मी बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. त्यांनी मला पकडल तरी हरकत नाही. मी पोलीस खात्याचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे मी अटक झाल्यानंतरही माझी लढाई लढतच राहणार. मी जे काही आरोप केले ते सिद्ध करूनच दाखवणार आहे. गुड बाय मित्रांनो,’ असंही रणजित कासलेंनी म्हटलं आहे.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर?
“अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत आणि एसआयटीची स्थापना करावी,” अशा बातम्या मी टीव्हीवर पाहिल्या. मात्र, माझ्या मते फक्त एसआयटी स्थापन करून काहीही निष्पन्न होणार नाही. जर खरोखरच सत्य बाहेर आणायचं असेल, तर केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील एसआयटी नेमली गेली पाहिजे.
वाल्मिक कराड एन्काऊंटरबाबत मला प्रस्ताव देण्यात आला होता. मी स्पष्टपणे नकार दिला—”हे पाप माझ्या हातून होणार नाही.” या प्रकारात १० कोटी, २० कोटी, अगदी ५० कोटी रुपयांपर्यंतची एकरकमी ऑफर दिली जाते. कोणताही पोलीस अधिकारी कुठेही असला, तरी त्याला मुद्दाम हव्या त्या विभागात आणलं जातं. मी सायबर विभागात होतो आणि वरिष्ठांना माहिती होतं की, ‘हा माणूस हे काम करू शकतो, याच्यात ताकद आहे.’ मी हे सांगताना स्वतःचा अभिमान मिरवत नाही, पण जर मी उघड बोललो, तर सत्तेची कुत्रं माझ्यावर भुंकायला लागतील.
एका ठराविक पद्धतीनुसार हे सगळं घडतं. चार जणांची पोलीस टीम तयार होते आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होते. त्या बैठकीत पुढील कृतीचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर पाच-सहा विश्वासू लोकांची दुसरी टीम तयार केली जाते, जी थेट घटनास्थळी पाठवली जाते—जसं की अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडलं असावं.ही टीम एका अधिकाऱ्यासह, दोन अंमलदार आणि एका हवालदारासह कार्यरत असते. यांना ५ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या रकमांची ऑफर दिली जाते. पुढे चौकशी झाली तरी, “आपलं सरकार आहे, तुम्हाला वाचवू,” अशा प्रकारे पोलिसांची मनधरणी केली जाते. याप्रकारे खोटं एन्काऊंटर घडवून आणलं जातं, असं विधान रणजीत कासले यांनी केलं आहे.