नवी मुंबई/सिद्धेश प्रधान – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट पंचक्रोशी आणि पणदूर तिठा येथील शाळेनंतर बेलापूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) किशोर पाटकर यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील शिवाजी विद्यालय हिर्लोक आणि श्री वासुदेव सरस्वती विद्यालय माणगाव(तांबडवाडी) येथील दूरवरून पायपीट करत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 200 सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यामुळे दूरवरून पायपीट करत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. यापुढे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दैनिक ‘ नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पाटकर सहकुटंब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेले असता त्यांना दूरवरून पायपीट करत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा दिसून आल्या होत्या. कोकण म्हंटले की दुर्गम भाग, त्यात जितके अंतर चालून शाळेत यायचे तितकेच अंतर पुन्हा शाळा सुटल्यावर पायपिट करत घर गाठायचे. यात हे विद्यार्थी थकून जायचे. मात्र शिकण्याची जिद्द असलेले विद्यार्थी न थकता, कोणतीही तक्रार न करता शाळेत येत असतात. ऊन, पाऊस, थंडी कसलीही तमा न बाळगता विद्यार्थी कित्येक किलोमीटर अंतर चालून पायपिट करत शिक्षण घेत आहेत. शाचे भावी नागरिक असणाऱ्या या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि दुर्गम भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वितरण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील शिवाजी विद्यालय हिर्लोक या शाळेतील शंभर गरजू विद्यार्थ्यांना आणि वासुदेव सरस्वती विद्यालय माणगाव (तांबडवाडी) येथील दुर्गम भागातून तसेच दूरवरून पायपीट करत शाळेत येणाऱ्या 100 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वितरित केल्या आहेत. अश्या दोनशे सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकल मिळाल्यामुळे त्यांचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचणार असून, अभ्यासावर लक्ष देणे शक्य होणार आहे. त्याबद्दल विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांनी किशोर पाटकर यांचे आभार मानले आहेत.
शहरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सर्व सुखसोयी किंवा सुविधा उपलब्ध असतात. मात्र, खेडोपाड्यात, दुर्गम भागात दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने शाळेत येण्या -जाण्यासाठी कोसो मैल पायपीट करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा गाठावी लागते. त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बराच वेळ खर्ची होतो. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुरेसा वेळ मिळत नाही. याआधी किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील पाट पंचक्रोशी येथील एस. के. पाटील शिक्षण मंडळ संचलित डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयातील शंभर गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि कुडाळ तालुक्यातीलच पणदूर तिठा येथील वेताळ-बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय तसेच अँड. रामकृष्ण कोल्हे इंग्लिश मीडियम स्कूल मधील 100 गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलींचे मोफत वितरण केले होते.
शहरी भागात दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र सिंधुदुर्ग भागात विद्यार्थी हाल अपेष्टा सहन करत शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना रोज रिक्षा अथवा, बसने जाणे देखील परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी हुशार असूनही अनेकदा त्यांचा वेळ पायपिट करण्यात जातो. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. अशा गरजू विद्यार्थ्यांना सायक पुरवत आहोत. त्यामुळे त्यांचा वेळ वाचून अभ्यासाला वेळ देता येईल. ऊन, पावसाळ्यात प्रवास करणे सोपे जाईल. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात टप्प्या टप्प्यात सायकल वाटल्या जाणार आहेत.