ठाकरे गटाला धक्का! विलास शिंदेंचं भव्य शक्तिप्रदर्शन; शेकडो वाहनांसह मुंबईकडे रवाना
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठया घडामोडी घडत असून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे नाशिकचे प्रभावशाली नेते आणि महानगरप्रमुख विलास शिंदे आज शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते अधिकृत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत आठ माजी नगरसेवक, १२ जिल्हा परिषद सदस्य, ४० पेक्षा अधिक सरपंच, तसेच जिल्हा बँक आणि बाजार समितीचे माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, निवडणुकीत फडणवीसांनी…
ठाकरे गटाला महिन्याभरात लागलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत मोठी राजकीय चर्चा रंगवली होती. आता विलास शिंदेंसारखा जुळवून घेणारा आणि संघटनात्मक ताकद असलेला नेता शिवसेनेत सामील होत असल्याने ठाकरे गटाला आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना विलास शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी गेली ३० वर्ष शिवसेनेत कार्यरत आहे, १९९६ पासून शाखाप्रमुख आहे. मला कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहचवण्यात आली होती,” असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं उघडपणे कौतुक केलं होतं. “शिंदे साहेबांनी कधीच आमचा गट पाहिला नाही, केवळ आमची कामं पाहिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत असलेले नेतृत्व एकनाथ शिंदेंकडेच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आज पक्षप्रवेशाच्या वेळी विलास शिंदे एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार भेट म्हणून देणार आहेत. या प्रतीकात्मक भेटीद्वारे त्यांचे पूर्ण निष्ठा आणि समर्थन दर्शवले जाणार आहे. यामुळे आगामी काळात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता आहे.