संग्रहित फोटो
माळेगाव : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेत काहीतरी मार्ग काढा, अशी मध्यस्थी केली होती, असे स्पष्टीकरण देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आम्ही विचार करून सांगतो म्हणल्यावर, विरोधकांनी त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही आपल्यासाठी चांगले वातावरण आहे, असे सांगितल्यावर मग ठरवले आपण पॅनल करायचा आणि तुम्ही भरघोस मतांनी श्री निळकंठेश्वर पॅनलला निवडून दिलेत आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो असून निवडणुकीत दिलेला शब्द आपण पूर्ण करून माळेगाव राज्यात अग्रेसर कारखाना करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विजयाच्या आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचा कारभार पारदर्शक व शिस्तबद्ध करणार असल्याचे सांगून, पवार यांनी कारखान्याच्या हितासाठी आमचे संचालक मंडळ कमी पडणार नाही, असा शब्द दिला. भविष्यात कारखाना, शिवनगर प्रसारक मंडळातील शिक्षण, प्रयोगशाळेचा दर्जा, आयटीआयचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञान यावर काम करणार. कारखाना हा आपला प्रपंच असुन हा विजय आपल्या सर्वांचा आहे, असे पवार यावेळी म्हणाले,
शरद पवार यांच्या पक्षाकडूनही आला होता निरोप
“पक्षाचे तालुकाध्यक्ष एस.एन जगताप माझ्याकडे आले होते. पॅनलमध्ये आम्हाला सहा जागा द्या म्हणाले होते. मी त्यांना दोन जागा व एक जागा स्वीकृत संचालक देतो म्हणालो. त्यांनी मान्य असल्याचे सांगत नंतर हे जमणार नाही असे सांगितले. नवीन नवीन मुद्दे ते काढू लागल्याचे पवार म्हणाले.
चेअरमनपदासाठी स्वतःचे नाव का
माळेगावच्या सभासदांनी हे लक्षात घ्या मी कुठेही टोकाची भूमिका घेतली नव्हती. पण ज्यावेळी माझ्या लक्षात आले की मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र चेअरमनपदाच्या स्पर्धेमध्ये सहा ते सात लोक इच्छुक होते. याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये. बारामतीतील सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे. यासाठी मला माझे नाव जाहीर करावे लागले, असे ते म्हणाले.
सर्व सभासद कारखान्याचे चेअरमन
आपले २० लोकांचे संचालक मंडळ सभासदांनी निवडून दिले आहे. प्रत्येकाने योग्य सूचना कराव्यात. माझ्या नावाचा गैरवापर करू नये. त्याला माझा विरोध असेल. विरोधक त्यांच्या परभावला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, आपल्याला पारदर्शक कारभार करायचा आहे.