मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेस (Congress) पक्षाचे चित्र बदलताना दिसत आहे. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि इतर पक्षात प्रवेश केला. मुंबईतील या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर काँग्रेसचे रूप बदलले आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्धकी, संजय निरुपम हे काँग्रेसचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जात होते.अशातच काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने हायकमांडवर नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नसीम खान(Naseem Khan) हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्याऐवजी या मतदार संघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर नसीम खान यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अशातच त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा हायकमांडवर पाठवला आहे.
नसीम खान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्रमध्ये पक्षाचा प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे. मी ती जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागा असे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री, जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता या जागेवर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको,असे कसे चालू शकेल? असा सवाल नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेसच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मी देखील नाराज असल्याचे नसीम खान यांनी सांगितले आहे.