मुंबईत महायुतीला मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
रिपब्लिकन पक्ष मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा अंदाज
महायुतीवर रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा
महायुतीमधून बाहेर पडलेलो नाही – आठवले
मुंबई: राज्यात लवकरच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. महायुती अनेक ठिकाणी एकत्रितणे तर अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता मुंबईमध्ये शिवसेना-भाजप यांची युती झाली आहे. दरम्यान महायुतीमध्ये रामदास आठवले नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाट रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून रामदास आठवले संतापले असल्याचे समोर येत आहे. रामदास आठवले यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
आम्ही महायुतीतून बाहेर पडलेलो नाही. जिथे आमची मैत्रीपूर्ण लढत नाही, तिथे महायुतीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. महाराष्ट्रभर सत्य हेच आहे, पण बदलत्या राजकारणात पक्षाची ताकत जमिनीवर दाखवणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन सांगायचं तर मतभेद फक्त जागांच्या वाटपात असू शकतात, विचारांच्या एकजूटीत अजूनही फरक नाही. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रामवर पूर्ण विश्वास आहे, आणि नववंचित, शोषित समाजासाठी महायुतीच्या माध्यमातून काम करणं आमचं ध्येय आहे.
आज काही इतर राजकीय पक्ष मुंबईत सत्ता आणून दादागिरी करू पाहत आहेत, ज्यामुळे मुंबईकरांच्या अस्मितेला धोका निर्माण होतोय. पण त्यांच्या विरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरपीआय 39 ठिकाणी आपली ताकद दाखवेल, उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एक मात्र स्पष्ट आहे: कोणताही संभ्रम न ठेवता दलित-वंचित समाजाचं मत एकवटून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित हा समाज आमच्या पाठीशी आहे, आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहोत.
शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट
मुंबईत महायुती म्हणून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनुसार, या युतीत भाजपसाठी १२८ तर शिंदे गटासाठी ७९ जागा निश्चित आहेत. उर्वरित २० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. संभाजीनगरमधील महायुती अखेर तुटली आहे. आम्ही विश्वास ठेवला पण भाजपने विश्वासघात केला, अशा शब्दात राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.






