संग्रहित फोटो
पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात नगरपालिकांवर वर्चस्वासाठी भाजपा व शिवसेना शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली होती. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाचा विजयी वारु कायम राहिला. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जेमतेम यश मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली. सातारा जिल्ह्यात भाजपा नंबर वन ठरला. दहापैकी सात पालिकांवर भाजपाने सत्ता प्रस्थापित केली. सातारा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचाच बोलबाला राहिला.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट भाजपाला वरचढ ठरला. शिंदे गटाने मुरगुड, हातकणंगलेत झेंडा फडकाविला. कुरुंदवाड, जयसिंगपूरमध्ये माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्ता कायम राखली. कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्या साथीने आपला गड राखला. मुरगुडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यानी मुश्रीफ-घाटगे गटाला धोबीपछाड दिला. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही भाजपाने बाजी मारली. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ गटाने भाजपा, शिवसेना शिंदे गट, जनता दलावर मात केली. माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने पन्हाळा व मलकापूर नगरपालिकेवर वर्चस्व राखले.
जयंत पाटील भाजपाला भारी ठरले
सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर व आष्ट्यात माजी मंत्री जयंत पाटील भाजपाला भारी ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही जयंत पाटील यांनी दोन्ही ठिकाणी आपला मुत्सद्दीपणा सिद्ध केला. विट्यात शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पाटील गटाला मोठा झटका बसला. शिराळ्यातही शिंदे गटाच्या पृथ्वीराज नाईक यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुलाल उधळला.
तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील (काका) यांच्या गटाने आमदार रोहित पाटील गटाचा पराभव केला. पलूसमध्ये माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपाचे आव्हान परतावून लावले. या निवडणुकीत महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटात वर्चस्वासाठी रस्सीखेच राहिली. काेल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपाला मागे टाकले.
अकलूज मोहिते पाटलांनी राखले
सोलापूर जिल्ह्यात अकलूजमध्ये मोहिते पाटील गटाने भाजपाला रोखले. खासदार धैर्यशील माेहिते पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे यांची यांची खेळी निष्प्रभ केली. पंढरपूरमध्ये भगिरथ भालके यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कसर भरून काढत पत्नी प्रणिता भालके यांना निवडून आणले. पंढरपूर व मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी पाटील (बापू) यांनी शेकाप व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले.
रामराजेंच्या पुत्राचा धक्कादायक पराभव
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या कराडमध्ये भाजपाचे कमळ कोमेजले. येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व शिवसेना शिंदे गटाने भाजपाला अस्मान दाखविले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिंदे गटाचे राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपाच्या विनायक पावस्कर यांचा पराभव केला. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लागला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.






