संग्रहित फोटो
काँग्रेसच्या घराणेशाहीवर भारतीय जनता पक्षाने सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामपंचायत स्तरापासून आमदारकीपर्यंत नात्यागोत्यातील राजकारणाला महत्त्व आले होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली असताना दिल्लीमधून नात्यागोत्यातल्या उमेदवारांना, इच्छूकांना वगळा अशा प्रकारचा आदेश आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी रविवारी सांगितले. त्यामुळे संबंधित इच्छुकांची पंचाईत होणार आहे.
गेल्या काही काळापासून प्रभाग पद्धतीमध्ये महिला आरक्षण झाल्याने अनेकांनी राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या आपल्या बहिणीला, पत्नीला, आईला किंवा सुनेला, मुलीला उभे करून महापालिकेवर अप्रत्यक्षपणे सत्ता मिळवली होती. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा नात्यागोत्याच्या राजकारणाला बहर आला होता. अशा काळात केंद्रीय नेतृत्वाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी स्थानिक पातळीवर घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे स्वागत कार्यकर्ते करीत आहेत.
भाजपच्या उमेदारांचा प्रचार सुरु
भाजपची यादी निश्चित झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला किती आणि कोणत्या जागा द्यावयाचे हे सुद्धा ठरले आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नावांची घोषणा उशिराने केली जाणार आहे. तरीही काही पक्क्या उमेदवारांना कामाला लागा, असे संदेश अधिकृतपणे पाठविण्यात आले आहेत. आणि असे निरोप मिळालेले उमेदवार यांच्या गोटात प्रचाराची लगबग चालू झालेली आहे. हे केवळ भाजपमध्ये घडते आहे असे नाही अन्य पक्षातही निरोपानिरोपी सुरू झाली आहे. अदलाबदलीसाठी पाच दहा टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. एखादा तगडा उमेदवार मिळाला तर त्याची वर्णी लावण्याची सोय केलेली आहे. शिंदे यांच्या पक्षाचे एक उत्साही उमेदवार शनिवारी अर्ज दाखल करणार होते, त्यांना थांबा असा निरोप देऊन थांबविण्यात आले आहे.






