संग्रहित फोटो
मागील दोन-तीन दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यासाठी जागावाटपाबाबत दोन्ही गटांमध्ये बैठकही झाली होती. मात्र अजित पवार गटाने मांडलेला प्रस्ताव मान्य न झाल्याने शरद पवार गटाने या चर्चांपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटपावरून चर्चा पुढे सरकत नसल्याने, तसेच काही बाबतींमध्ये मतभेद असल्याने आघाडीबाबत चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित असल्याने महाविकास आघाडी मजबूत करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळाले होते.
मात्र आज महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने चित्र पुन्हा बदलले आहे. त्यामुळे शरद पवार यांची पुढील भूमिका काय असणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, याबाबत संभ्रम वाढला आहे. एकीकडे आघाडीतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच, दुसरीकडे पुण्यातील राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामतीमध्ये नक्की काय शिजलं?
रविवारी गौतम अदानी यांच्या हस्ते एआय सेंटरचे उद्घाटन बारामतीमध्ये पार पडले. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार उपस्थित होते व्यासपीठावरती शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका मिनिटांमध्ये कुजबुजत चर्चा झाली. दोन्ही नेते बारामतीला असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरती तोडगा निघणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. रविवारी पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाने गैरहजेरी लावल्यामुळे शरद पवार गट कोणाबरोबर जाणार या चर्चांना उधाण आले आहे.






