सौजन्य - नवराष्ट्र टीम
गिड्डे-पाटील हे मूळ कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावचे असून, तासगाव तालुक्याशी त्यांचा कोणताही अधिकृत संबंध नसतानाही त्यांनी तासगाव नगरपरिषद निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. याबाबत कवठेमहांकाळ तालुक्याचे मंडल अध्यक्ष उदयराजे भोसले, तासगाव ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्निल पाटील तसेच तासगाव नगरपालिकेचे प्रभारी अनिल लोंढे यांनी पक्षाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यानंतर पक्षांतर्गत चौकशी व चर्चा करून गिड्डे-पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, गिड्डे-पाटील यांनी भाजपच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत भूमिका घेत तासगाव नगरपरिषद निवडणुकीदरम्यान काही व्यक्तींना उमेदवारी अर्ज भरण्यास प्रवृत्त केले. तसेच भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अन्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्याबाबत चर्चा केल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होईल अशी विधाने केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणूक काळात व त्यानंतर घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे पक्षाने नमूद केले आहे. पक्षाच्या अंतर्गत शिस्त, संघटनात्मक निर्णय आणि अधिकृत भूमिकेच्या विरोधात वारंवार भूमिका घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड करत नसून, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
१५ तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार : संदीप गिड्डे-पाटील
पक्षाने केलेल्या कारवाईनंतर संदीप गिड्डे-पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार ते मुंबईतील मानखुर्द–शिवाजीनगर प्रभागात प्रचारात कार्यरत आहेत. जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या पत्राबाबत प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाली असून, १५ तारखेनंतर याबाबत भूमिका स्पष्ट होईल. तासगाव नगरपालिकेबाबत घेतलेली भूमिका जाहीर असून, त्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.






