संग्रहित फोटो
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार रणशिंग फुंकले आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या दमाने सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तासगाव शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्ष जवळपास विस्कळीत झाला होता. मात्र भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे-पाटील यांनी पुन्हा संघटन उभे करण्यासाठी कंबर कसली आणि तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाला नवसंजीवनी दिली. आज त्या प्रयत्नांचे फळ दिसू लागले असून, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपची चळवळ नव्या जोमाने गती घेत आहे.
गावागावात सदस्य नोंदणी मोहीम राबवून पक्षाचा विस्तार करण्यात आला. अगदी मोजके कार्यकर्ते असताना सुरू झालेली ही वाटचाल आता घडवलेल्या संघटनशक्तीच्या रूपात उभी टाकली आहे. ग्रामीण आणि शहरातील कार्यकारिणी मजबूत करत, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून भाजपने तासगावात पुन्हा पाय रोवले आहेत.
तासगाव शहर आणि ग्रामीण या दोन कार्यालयांच्या उद्घाटनावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. संदीप गिड्डे-पाटील स्वतः जबलपूर दौऱ्यावर असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र “पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे त्यांनी म्हटले. भाजप आता स्पष्टपणे नव्या संघटनशक्तीकडे वाटचाल करत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका तिन्ही निवडणुकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी तासगाव भाजप सज्ज आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत आहे.
कार्यालयाच्या उद्घाटनावेळी तासगाव भाजप तालुकाअध्यक्ष स्वप्निल पाटील, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष उदय भोसले, तासगाव शहर अध्यक्ष स्वाती सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, विशाल भोसले, राजू लिंबले, किरण जाधव, शिवाजी गुळवे, पंकज पाटील, अक्षय सूर्यवंशी, अजय सूर्यवंशी, अक्षय यादव, अभय माने, सुशांत माने, अनिल माने, सूर्यकांत पवार, सारंग पवार, नामदेव पाटील, महेश पाटील, पुष्कर कालगावकर, विशाल गिड्डे, विक्रम कोळेकर, विक्रांतसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी मिळवत विकासकामांना वेग आला आहे. “पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे,” असा विश्वास संदीप गिड्डे-पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, “सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ही कार्यालये जनतेसाठी सदैव खुली राहतील.”






