भाजप आमदार प्रसाद लाड ( फोटो - ट्विटर)
राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. मध्यंतरी त्यांचा मोर्चा मुंबईत आला होता. तेव्हा सरकारने त्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे. नुकतीच त्यांची राज्यभरात आरक्षण रॅली पार पडली. मात्र या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील विरुद्ध भाजप आमदार प्रसाद व प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. दरम्यान पुन्हा एकदा आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना सुनावले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. अधिवेशनात विधानसभेत भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत त्यांचा विरोध केला होता. त्यानंतरही जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करणे सोडलेले नाही. त्यानंतर ते विधानपरिषद भाजपचे आमदार प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. लाड यांच्यावर देखील त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यावर बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना सुनावले आहे.
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारण करून, त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका!
🔸शरद पवारांचा जो मुका घ्यायचा तुम्ही चालू ठेवलाय तो आधी थांबवा!
🔸दरेकरांना देखील म्हणालात कि घरात घुसू, परंतु तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या!#मराठा #मराठा_आरक्षण #Maratha… pic.twitter.com/iuV8iRZxDm— Prasad Lad (@PrasadLadInd) August 16, 2024
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, ”एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या आंदोलनकर्त्याचा किती सन्मान करायचा याबद्दल एक वेळ असते, एक सन्मान असतो. मात्र वेळोवेळी एखाद्या गोष्टीच राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचे काम जर मनोज जरांगे पाटील करणार असतीलआणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या, त्यांना जे करायचे आहे ते करूद्या बघून घेईन असे म्हणायचे. जरांगे पाटील मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो, आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो ना, हे धंदे करूनच मोठे झालो.”
पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले, ”तुम्ही परवा प्रवीण दरेकरांना म्हणालात घरात घुसू, पंखे तोडू. तुमच्यात हिमंत असेल तर, तुम्ही मुंबईत या. देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा, आम्ही घेऊ पण तुम्ही शरद पवारांचा मुका घेणे बंद करा आणि मराठा आंदोलनाचे राजकारण करून त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे, प्रामाणिकपणे सांगितले होते, हिंमत असेल तर राजकारणात या. राजकारणात येऊन संविधानाच्या मदतीने प्रश्न सोडवा. तुम्ही जर आमच्या बाबतीत खालची भाषा वापरणार असाल तर आता सौम्यपणे उत्तर देतोय. यापुढील उत्तर तुमच्या उत्तरापेक्षा घाणरेडे असेल हे लक्षात ठेवा.”