येत्या काळात महायुती फुटणार? अशोक चव्हाणांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, ‘सर्वाधिक आमदार..’
Ashok Chavan on Mahayuti : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक संस्था म्हणजेच महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून पक्षबांधणी सुरू झाली आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी नांदेड येथे बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना अशोक चव्हाण म्हणाले, “आमची ताकद नांदेड शहर आणि जिल्ह्यात आहे. त्या शहरांत राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेची ताकद असली तरीही तिथे भाजपाची ताकद वाढली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आगामी काळात प्रत्येक क्षणाला सैन्य तयार असलं पाहिजे. आम्ही घटकपक्षाच्या विरोधात बोलत नाहीत. शेवटी आमचाही पक्ष आहे. आमचा पक्ष वाढवण्याचा आम्हाला अधिकार आहे. आपली ताकद निश्चित आहे.”
पुढे म्हणाले, “आपली ताकद निश्चितच अधिक आहे. प्रमुख राज्यात आपल्या पक्षाचे नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे आहेत. शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे. सर्वाधिक आमदार आपले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आपला आहे. आगामी काळात परिस्थिती जी काही निर्माण होईल, त्या युद्धाला तयार राहिलं पाहिजे.”
त्यामुळे सर्व पातळ्यांवर आपली तयारी सर्व मतदारसंघात आहेत. याचा अर्थ आपण त्यांच्या विरोधात लढतोय असं नाही. घटकपक्षांच्या विरोधात लढतोय असं नाही. युती आहे तर जागा सोडून द्याल, तर असं काही ठरलेलं नाही. तुम्ही जर म्हणालात तर स्वबळावर आम्ही निवडणुका लढवू शकतो. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं मत आपण आपल्या वरिष्ठांना कळवू. आपल्याला जिथे पोषक वातावारण आहे, त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत. त्या जागा अधिकाधिक प्रमाणावर लढायचं आहे. तुम्ही सांगा त्याप्रमाणे आपण निवडणुकीची तयारी करू”, असं अशोक चव्हाण म्हणाले.