डोंबिवली: स्थानिक मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. तसेच पालकांसोबत उद्धट वर्तन केलं जातं असा आरोप करीत भाजप महिला कार्यकर्त्यांनी डोंबिवली पूर्व भागातील भोपर येथील गार्डियन शाळेत मुख्याध्यापिकेच्या दालनाबाहेरच गोंधळ घातला. या गोंधळा दरम्यान शाळेच्या महिला कर्मचारी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. शाळा प्रशासनाकडून पालकांनी केलेले आरोप फेटाळून लावण्यात आले आहे. या गोंधळामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते.
डोंबिवली पूर्व भागातील भोपर परिसरात गार्डीयन शाळा आहे. या शाळेत आज गोंधळ निर्माण झाला होता. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि पालक शाळेत घुसले. मुख्याध्यापकांच्या दालनाबाहेर मुख्याध्यापकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शाळेतील महिला कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घुसणाऱ्या पालक आणि भाजप महिला कार्यकर्त्यांना मज्जाव केला. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि शाळेतील महिला कर्मचारी यांच्यात झटापटी झाली. यावेळी तणावची परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी आरोप केला की, स्थानिक मुलांना शाळेत प्रवेश नाकारला जातो. काही कामानिमित्त पालक आणि लोकप्रतिनिधी मुख्याध्यापकांना भेटायला आले तर मुख्याध्यापिका ज्योती मेनन या भेटत नाहीत. त्यांच्याकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली जाते. जवळपास एक तास हा सगळा गोंधळ सुरु होता.
शाळा प्रशासनाचं म्हणणं काय?
दरम्यान याबाबत शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, शाळेवर भाजप महिला कार्यकर्त्यांनी लावलेले आरोप चुकीचे आहे.आमच्याकडून कोणालाही चूकीची वागणूक दिली जात नाही. सगळ्यांना प्रवेश दिला जाताे. आजचा जो प्रकार शाळेत घडला तो गैरसमजुतीतून घडला आहे. कोणत्याही प्रकारची चूक शाळेकडून झालेली नाही. यापुढेही आमच्याकडून कोणती चूक होणार नाही.