पुणे : कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई वाढवली असून, आठवड्यात सलग दुसर्यांदा शहरात नाकाबंदी कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री शहरातील विविध भागात ११७ मद्यपींवर कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. तर, तीन दिवसांपुर्वी ८५ जणांवर कारवाई करण्यात आली होती.
वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ११७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.
वेगवेगळ्या भागात कारवाई करून १ हजार ४०९ वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ११७ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. यामध्ये येरवडा व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त प्रत्येकी १० व ११ जणांवर कारवाया करण्यात आल्या. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाईसोबतच इतर २६२ कारवाया करून २ लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.