कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना
बोईसर, सुशांत संखे : बोईसर एमआयडीसीतील रेमी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये काम करताना दोन कामगार भाजल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत अतिक खान आणि वसिम सलमानी हे दोघे ४५ ते ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एडवान्स कुलींग बोईसर एजन्सीला कंपनीकडून वातानुकुलीत यंत्रणांची वार्षिक सर्व्हिस करण्याचा ठेका देण्यात आला होता. दुपारी सुमारे ३:४० वाजता हे कामगार सर्व्हिस करत असताना गॅस जास्त प्रमाणात भरल्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि त्यातून दोघे कामगार भाजले. ही माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी बी. पी. सिंग यांनी दिली. अपघातानंतर दोन्ही कामगारांना तात्काळ बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
वातानुकुलीत सर्व्हिस करणाऱ्या कामगारांकडे आवश्यक प्रशिक्षण व अनुभव नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. एडवान्स कुलींग बोईसर एजन्सीच्या मालकाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
याचदरम्यान,वाळूज येथील सुप्रीम सिलिकॉन कंपनीला सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात सिलिकॉन व इतर रासायनिक रॉ मटेरियल असल्याने उशिरापर्यंत आगीची धगधग सुरू होती अभिजित सूर्यवंशी यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन (एच सेक्टर, प्लॉट क्र.५५) या नावाने कंपनी असून या कंपनीत सिलिकॉनचे उत्पादन घेण्यात येते. सोमवारी १२ ते १५ कामगार काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास कंपनीत आग लागल्याचे कामगारांना दिसून आले.
आगीची माहिती मिळताच एमआयडीसीचे दोन बंब गरवारे एक तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास तीन ते साडे तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण मशीनरी व सिलिकॉन मटेरियल जळून भस्मसात झाले.






