लातूरमधील वन डे ट्रिप स्पॉट असलेले हत्तीबेट पर्यटन स्थळ उदगीरमध्ये जोरदार चर्चेत आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Hattibet tourist spot: उदगीर : दिवाळी सुट्यांमुळे हत्तीबेट पर्यटनस्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणाने चक्क पर्यटकांसह अभ्यासकांना भुरळ घातली आहे. आठ दिवसांत ३८ हजार ४०६ पर्यटकांनी हत्तीबेटाला भेट दिल्याची नोंद झाली आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी दीपावली सणानिमित्त स्वतःच्या गावी आल्यानंतर हत्तीबेट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.
हत्तीबेट पर्यटनस्थळाला पौराणिक महत्त्व देखील आहे. स्कंदात वर्णन केलेली गजेंद्रमोक्षाची कथा याच ठिकाणी घडल्याची आख्यायिका आहे. येथील गुहेत अऋषीमुनींनी व देवदेवतांनी जप साधना केली असल्यामुळे या हत्तीबेट गडाला मोठे महत्व आहे. शिवाय, येथील मुख्य लेणीच्या गर्भगृहात सगुरू गंगाराम बुवा महाराजांची संजीवन समाधी, श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थ मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी दिवसांपासून बेटावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. हत्तीबेटावर पुरातन स्थापत्य कलेची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक गुहा, लेण्या आहेत. प्रभू रामचंद्राच्या व अन्य देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.हत्तीबेटाची ओळख आता ऑक्सिजन बैंक म्हणून सर्वदूर पोहोचली आहे. या बेटावर बालकांना खेळण्यासाठी सोय करण्यात आली आहे. हत्तीबेटाच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वनराई देखील फुलली आहे. यामुळे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि निसर्गाची मुक्त उधळण यामुळे हत्तीबेट पर्यटनस्थळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हत्तीबेट मिनी माथेरान; पर्यटनस्थळाचा दर्जा
लातूर जिल्ह्यातील नावारूपाला आलेले हत्तीबेट पर्यटन स्थळ म्हणून महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. राज्य शासनाने या पर्यटन स्थळास ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. पर्यटन स्थळाच्या विकासासाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयानामुळे सात कोटींची विकासकामे सुरू आहेत. वर्षभरात २४ लाख ७८ हजार पर्यटक, भाविकांनी आणि पर्यटकांनी हत्तीबेटास भेट दिल्याची नोंद आहे. बेटावरील गर्दी केवळ पर्यटनपुरती मर्यादित नसून इतिहास आणि निसर्ग यांचा संगम अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या उत्साहाची साक्ष देणारी ठरत आहे. हत्तीबेट म्हणजे लातूरच्या पर्यटन नकाशावरील चमकते रत्न आहे असे प्रशांत अपसिंगकर यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हत्तीबेट पर्यटन स्थळी विद्यार्थ्यांच्या सहली देखील येत असतात. आम्ही पर्यटनाचा लुटण्यासाठी याठिकाणी हत्तीबेट पर्यटन स्थळाची वेबसाईट पाहून आलो. येथील जागृत देवदेवतांचे सहकुटुंब दर्शन घेतले. हत्तीबेटाचा परिसर पाहून आम्हाला मोठा आनंद झाला.अशा भावना वागदरी अक्कलकोट येथील शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सौनकवडे यांनी व्यक्त केल्या आहेत.






