मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ
दरम्यान कुलाबा येथे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर शनिवारी पहाटे किमान तापमान २२.८ अंशांवर नोंदविण्यात आले असून आर्द्रता तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली. परिणामी, सकाळ–संध्याकाळची गार हवा कमी होत दमट वातावरण जाणवू लागले असून घर व कार्यालयांतील पंखे आणि एसी पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकावर गेले असून शनिवारी पहाटे किमान तापमान २१.७ अंशांवर स्थिरावले आहे. येथेही आर्द्रता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने हिवाळ्यात अपेक्षित असलेली गारठ्याची भावना जवळपास नाहीशी झाली आहे. यंदा हिवाळ्यात अपेक्षित असलेले १८–१९ अंशांपर्यंत घसरणारे किमान तापमान फार काळ टिकले नाही.
30 जानेवारीच्या पहाटे मुंबई शहरात किमान तापमान २२.८ अंश तर उपनगरात २२.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने थंडी पूर्णपणे संपली असे ठामपणे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत किंचित वाढू शकते. मात्र २ फेब्रुवारीच्या सुमारास तापमानात थोडी घट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत हिवाळ्याची पूर्ण एक्झिट झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही वाढती आर्द्रता आणि किमान तापमानातील सातत्यपूर्ण वाढ पाहता, मुंबईकरांसाठी थंडीचा प्रभाव आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.
उत्तर भारतात सक्रिय होणाऱ्या वेस्टरन डिस्टर्बन्सचा अप्रत्यक्ष परिणाम मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर जाणवतो. या प्रणालीमुळे उत्तर भारतात ढगाळ वातावरण व पर्जन्यस्थिती निर्माण होते, परिणामी थंड वारे दक्षिणेकडे सरकतात. त्यामुळे मुंबईत किमान तापमानात तात्पुरती घट किंवा स्थिरता येऊ शकते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला अपेक्षित असलेला हा प्रभाव हिवाळ्याच्या पूर्ण एक्झिटला काही दिवसांचा अडथळा निर्माण करू शकतो. मात्र, आर्द्रतेत वाढ झाल्याने गारठ्याची तीव्रता कमीच राहण्याची शक्यता आहे.






