बारामती : बारामती येथील ॲड. प्रियदर्शनी कोकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पक्षाने सोशल इंजिनिअरिंग करत धनगर समाजातील कोकरे यांना उमेदवारी दिल्याने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे.
कोकरे यांना उमेदवारी दिल्याने बारामती मतदार संघात लढत आणखी रंगतदार होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा न करता खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्ष कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता होती.
बहुजन समाज पार्टीने धनगर समाजातील युवतीला उमेदवारी दिल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजातील मतदार आपल्याकडे खेचण्याची बहुजन समाज पक्षाची रणनीती असून, कोकरे यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
प्रियदर्शनी कोकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी बसपाचे महाराष्ट् सचिव हुलगेश चलवादी, पश्चिम महाराष्ट्राचे झोन प्रभारी काळुराम चौधरी, यशवंत ब्रिगेड चे अध्यक्ष बापूराव सोलनकर, सारिका भुजबळ, संपतराव टकले आदी उपस्थित होते.