कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
कोल्हापूर : कोल्हापुरातील पश्चिम भागातल्या फुलेवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये एका मजुरासह पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. यामध्ये नवनाथ अण्णाप्पा कागलकर (वय ३५, रा. नवश्या मारुती जवळ, राजारामपुरी) असे या व्यक्तीचे नाव आहे.
या दुर्घटनेत अक्षय पिराजी लाड (वय ३०), दत्तात्रय सुभाष शेंबडे (वय ३७), वैभव राजू चौगुले (वय २५), जया शेंबडे, समाधान वाघमारे या जखमी झाल्या आहेत. जखमींवर सध्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिल्लक राहिलेल्या एका पोत्याचा माल खाली करत असतानाच अचानक स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. याबाबतची माहिती अशी की, महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले. मंगळवारी सकाळी स्लॅब टाकण्यास सुरुवात करण्यात आली होती.
दरम्यान, रात्री पावणे नऊच्या सुमारास शेवटच्या एका पोत्याचे काम शिल्लक असताना साहित्य पाहून येणाऱ्या लिफ्टचा धक्का स्लॅबला लागण्याने हा स्लॅब कोसळला. यावर कामगार काम करत होते. स्लॅब कोसळताना त्याचा आवाज मोठा झाल्याने स्लॅबमधील चौघांनी खाली उड्या मारल्या. त्यातील दोघेजण स्लॅबबरोबर खाली आले. त्यामुळे स्लॅब खाली चौघेजण दबले गेले तर नवनाथ कागलकर यांचा जागीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
याबाबतची माहिती महापालिकेला समजताच पालिकेचे बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आले. घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ बचाव कार्य सुरू केले. नागरिकांनी स्लॅबमध्ये अडकलेला जखमींना बाहेर काढून तत्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. दुर्घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. वारंवार सूचना देऊनही गर्दी हटत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवावी लागली.