दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
सावन वैश्य , नवी मुंबई: ठाणे बेलापूर रोड ते मुलुंडच्या दिशेने जाताना दिवा सर्कल रोड हा दुचाकी चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या मार्गावरील अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागी मृत्यू झाला आहे. या रहदारीच्या मार्गावर वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने, वाहन चालक तसेच नागरिकांमध्ये पोलिसांबाबत रोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील जवळपास सर्वच रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. यामुळे या मार्गांवर खड्डे पडून अपघात होण्याचे प्रमाण घटले असले तरी, या मार्गावरील सिमेंटच्या दोन लेअरच्या गॅपमध्ये दुचाकीचा चाक अडकून अनेक अपघात होतात. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांपेक्षा सिमेंट मार्गावरील अपघात जास्त जीव घेणे ठरत आहेत. कारण खड्डे असलेल्या मार्गावर सर्वच वाहने सावकाश चालतात. मात्र सिमेंटच्या मार्गावर खड्डे जास्त प्रभावशील नसल्याने वाहने वेगाने जातात. अशातच सिमेंटच्या मार्गावरील दोन लेअरच्या गॅपमध्ये दुचाकीचे चाक अडकून अनेक बाईकस्वार खाली कोसळतात. अशातच या मार्गांवर अवजड वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्याने, अपघात ग्रस्त दुचाकीस्वार अचानक पडून अवजड वाहनात खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो. मागील नोव्हेंबर महिन्यात ऐरोली सेक्टर 8 वरील सिग्नल वर एका मायलेकाचा अपघात झाला होता. त्या अपघातात सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. आता याच ठिकाणी आणखी एका दुचाकी स्वराचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
30 सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास एम एच 48 ए एस 7391 वरील दुचाकी स्वार मुलुंडच्या दिशेने जात असताना, ऐरोली सिंगल जवळ असता त्याचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. या सिमेंटच्या रस्त्याच्या गॅप बाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात. मात्र आणखी किती बळी घेतल्यावर पालिका प्रशासन जागा होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मुंबईच प्रवेशद्वार असलेल्या या मार्गावर अनेक अवजड, हलकी वाहने, तसेच दुचाकी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. मात्र वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गावर एकही वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. विशेष म्हणजे या दिवा गाव सर्कलच्या समोरच वाहतूक पोलीस चौकी आहे. असं असून देखील फक्त दाखवण्यासाठीच वाहतूक कर्मचारी काही मिनिटे रस्त्या उतरतात. नंतर शोधूनही सापडणार नाही अशी अवस्था असल्याचं बोलत, नागरिकांकडून वाहतूक विभागाबाबत रोष व्यक्त केला जात आहे.