फोटो सौजन्य - Social Media
कोणताही व्यवसाय काळाच्या ओघात केवळ उपजीविकेचे साधन न राहता त्या गावाची ओळख बनतो. चिखली तालुक्यातील इसोली या छोट्याशा गावाचेही असेच झाले आहे. लोहार समाजातील काही कुटुंबांनी पिढ्यान्पिढ्या जपलेल्या विळे बनविण्याच्या कारागिरीमुळे इसोली गावाला राज्यभर वेगळी ओळख मिळाली असून ‘इसोलीचे विळे’ म्हणजेच दर्जा आणि टिकाऊपणाचे प्रतीक बनले आहे.
पोपळघट, लाड आणि पाठस्कर या कुटुंबांनी मिळून विळे निर्मितीच्या व्यवसायाला जणू एका कंपनीसारखा आकार दिला आहे. आज या व्यवसायावर गावातील २५ ते ३० कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असून सुमारे ५० कारागीर थेट या कामात गुंतलेले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात ‘इसोली’चे नाव घेताच “विळ्यांचे गाव” अशी ओळख अभिमानाने सांगितली जाते.
इसोली येथे तयार होणारी विळे बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, पुसद, वर्धा, परभणी, आंबेजोगाई, जालना, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, अंबड, घनसावंगी, परळी वैजनाथ यांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पोहोचवली जातात. सोयाबीन, ज्वारी, तूर, मका, शाळू, गहू या पिकांची सोंगणी तसेच भाजीपाला कापण्यासाठी या विळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विदर्भ-मराठवाड्यात ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात असल्याने इसोलीच्या विळ्यांना कायमच मागणी असते.
जनार्दन पोपळघट, ज्ञानेश्वर पोपळघट, रमेश पोपळघट, गणेश पोपळघट, शहाजी पाठस्कर आणि बळीराम लाड यांच्या कुटुंबांनी या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. विशेष म्हणजे घरातील महिला आणि तरुण मुलेही विळे बनविण्यात पारंगत झाली असून ही पारंपरिक कला त्यांनी आत्मसात केली आहे. या कुटुंबांनी केवळ व्यवसायच नव्हे, तर मुलांच्या शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले आहे. काही मुले खासगी कंपन्यांत, काही पोलिस दलात तर काही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.
या सहा कुटुंबांची एकत्रित वार्षिक उलाढाल सुमारे ५५ ते ६० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. लोखंडी मोटार पट्ट्यांपासून, विशेषतः जुन्या अॅम्बेसिडर कारच्या पट्ट्यांपासून विळे तयार केली जातात. मुंबई, खामगाव आणि जळगाव येथून कच्चा माल आणला जातो. दर्जेदार लोखंड आणि अचूक कारागिरीमुळे एक विळा १० ते १२ वर्षे टिकतो, असे कारागीर सांगतात.
पूर्वी ५० पैशांत विकले जाणारे विळे आज ३०० ते ३५० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. “नोकरी सगळ्यांनाच मिळेल असे नाही, त्यामुळे हातात एखादी कला असणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही मुलांना विळे बनवायला शिकवतो आणि पुढेही हा पारंपरिक व्यवसाय जपणार,” असे जनार्दन पोपळघट यांनी सांगितले.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या व्यवसायातून इसोली गावाने स्वतःचा ‘ब्रँड’ निर्माण केला असून ग्रामीण उद्योजकतेचे हे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.






