सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुण्यातील एक बहुचर्चित तसेच अत्यंत जुने आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत आता इतिहासजमा होणार आहे. जवळपास ७५ वर्ष पुर्ण केलेली ही इमारत येत्या दोन आठवड्यात पाडली जाणार आहे. येथे प्रशस्त व सर्व सुविधा असणारी इमारत उभारली जाणार असून, त्यासाठी २९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील बंडगार्डन पोलिस ठाणे १९५१ मध्ये बांधले आहे. वानवडी पोलिस ठाण्यातून विभाजन होऊन बंडगार्डन पोलिस ठाणे अस्तित्वात आले. जुनी व संख्येमुळे आता ती कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे नवीन इमारत उभारली जाणार आहे. पुढील एक-दोन आठवड्यांत त्याचे पाडकाम केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने नवीन पोलिस ठाण्यासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र, नवीन इमारत पूर्ण व्हायला किमान दोन वर्षे लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘सध्या या पोलिस ठाण्याच्या कामकाजासाठी नव्या जागेचा शोध सुरू असून, ‘पोलिस ठाण्याचे कामकाज तात्पुरते सोमवार पेठेतील पोलिस वसाहती शेजारी असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या इमारतीत हलवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, एक आठवड्यात पोलिस ठाणे स्थलांतर करणे अत्यंत अवघड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला या ठिकाणी परिसराचा विकास, सुशोभीकरण व इतर प्रशासकीय कामांसाठी जागा हवी आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पुणे पोलिसांना एक आठवड्याच्या आत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन जागा; २९ कोटींचा निधी
बंड गार्डन पोलिस ठाण्याची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालकीची आहे. सेंट्रल बिल्डिंगसमोर नवीन पोलिस ठाण्यासाठी २९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तात्पुरते आता या पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात स्थलांतर होणार आहे. इमारत उभारल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी सुरू होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जुने पोलिस ठाणे पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशस्त व सर्व सुविधा असणारी इमारत उभारली जाणार आहे.