सध्या राज्यात आणि देशात अनुक्रमे येऊ घातलेल्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महारष्ट्रातील राजकारणात दररोज नवे नवे राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अजित पवार भाजप सोबत गेल्याने महायुतीची ताकत आणखीनच वाढलेली आहे. तर, महाविकास आघाडीकडूनही निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच राज्यात असे काही प्रादेशिक पक्ष आहे जे एकट्याने निवडणुकीत उभे राहून विजय मिळवतात. त्याच पैकीच एक राष्ट्रीय समाज पक्ष आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी मागच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता . आतापर्यंत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. जानकर सध्या रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
काय म्हणाले जानकर?
जानकरांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली. यावेळी रासपने महायुतीची साथ सोडलीय का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, या राज्यात, देशात आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे, यासाठी गेल्या दिड महिन्यांपासून आम्ही रासपची जनस्वराज्य यात्रा काढली आहे. युतीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी (महायुती) आम्हाला बोलावलं नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना गृहित धरलं नाही.अलिकडेच त्यांची एनडीएची बैठक झाली. त्या बैठकीसाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण पाठवलं नव्हतं. आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. एनडीए किंवा इंडियापैकी (विरोधकांची आघाडी) कोणीच आम्हाला निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आम्ही सध्या एकटे आहोत आणि एकटेच चालत आहोत. मला असे वाटते की, भीक मागून हक्क मिळत नाहीत. सत्ता मिळवायची असेल तर स्वतःच्या हिंमतीवर आणि जबाबदारीने घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे.