संजय गायकवाड (संग्रहित छायाचित्र - ट्विटर)
मुंबई: शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. अखेर आता या प्रकरणात गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गायकवाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड याना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंग्रेसने ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”आम्ही गुन्ह्यांची पर्वा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असल्यास, काही अडचण नाही. याला गुंडगिरी म्हणत असाल तर ही गुंडगिरी मला मान्य आहे.
काय म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ?
जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?
हेही वाचा: आमदार संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन नाना पटोले संतापले, म्हणाले…
संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.