कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणी सरपंचसह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डू गाव हे मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आले आहे. आयपीएस अंजना कृष्णा यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवरून झालेल्या वादंगानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर देखील हल्ला करण्यात आला. यामुळे कुर्डू गावातील अवैध मुरुम उपसा याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर सरपंचसह ग्रामसेवकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मुरूम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये आता कुर्डू गावच्या सरपंच कुंता चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातिल १२० ब्रास आणि ७२ हजार रुपये किंमतीचा मुरुम अवैधरित्या उपसा करुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी प्रिती शिंदे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच आणी ग्रामसेवक या दोघांनी संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद झाली आहे. माढा महसुल प्रशासनाने दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरुन कुर्डूत तहसीलदारांची अथवा कोणतीही शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या मुरुम उपसा झाला आहे, हे दाखल झालेल्या तक्रारीवरून आता उघड झाले आहे. त्यामुळे कारवाई रोखण्यासाठीच आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केलेला हे आधोरेखित झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता. मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्या, परवाना न घेता उत्खनन केलेला होता हे अंतिमरित्या स्पष्ट झाले आहे. शिवाय याप्रकरणी अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे आणि नितीन माळी या चौघांसह गावातील इतर १५ ते २० लोकांवर दि. ३ सप्टेंबर रोजी सरकारी कामात अडथळा आणणे, हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादीबाबत गुन्हा दाखल केला आहे.
प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच
कुर्डू येथे सुरू असलेला मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी किंबहुना अर्ज देखील दिलेला नाही. विशेष म्हणजे ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरु असल्याचा दावा केला जातोय, त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत ही आधीच संपली आहे. एका रस्त्यासाठीची वर्कऑर्डर ऑक्टोबर २०२४ मध्ये तर दुसऱ्या रस्त्याची वर्कऑर्डर मुदत एप्रिल २०२५ मध्ये संपली असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. कुर्डू गावात मुरूम उपसा संदर्भात झालेल्या प्रकरची तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना सूचना देखील केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोणतीच परवानगी घेतलेली नाही
गावातील तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरूम उपसा करावायचे असल्यास त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामासाठी कोणतेही रॉयलटी न घेता परवानगी दिली जाते. मात्र कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील ही माहिती उघड झाली आहे. दरम्यान जिल्हातील अवैध मुरूम, वाळू उपसावरील कारवाई संदर्भत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत अवैध वाळू, मुरूम उपसा संदर्भात कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याची ही माहिती देखील पुढे आली आहे.