काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत; भाजपला मोठा धक्का (संग्रहित फोटो)
वाई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात वाई तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या एका घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जयकुमार गोरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या रुतुजा शिंदे यांच्यासह बावधन व शेंदुरजणे गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर प्रमोद शिंदे, मोहन जाधव, प्रताप पवार, मदन भोसले, किरण काळोखे, अरविंद कुदळे, शंकरआप्पा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवेशावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले, ‘टोकाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आम्ही आज एकत्र आलो आहोत. हे अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. पण हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे. येथील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी दोन पावले मागे घेत एकोप्याचा मार्ग स्वीकारला. मतभेद विसरून या भागाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे’.
हेदेखील वाचा : Solapur Election 2026: पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट, सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द
यावेळी मेघराज शिंदे, सोसायटी चेअरमन प्रकाश मारुती शिंदे, माजी सरपंच रामदास खामकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन दिलीप पिसाळ यांनी केले, तर मदन भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बावधन जिल्हा परिषद गट, शेंदुरजणे गण व बावधन गणातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयकुमार गोरे यांनी घेतली काडादी यांची भेट
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला.
हेदेखील वाचा : Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित






