फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या संभाजीनदर दौऱ्यावर आहेत. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मात्र ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या पक्षप्रवेशावर नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
त्यांनी शिवसेना विरोधात भूमिका घेतली होती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील प्रवेश वाढले आहे. भाजपचे राजू शिंदे यांनी देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे माजी चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. खैरे म्हणाले, “राजू शिंदे यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लवकर या. लोकसभा निवडणुकीच्या आधी या. परंतु, ते लोकसभा निवडणुकीच्या काळात तिकडेच थांबले. निवडणुकीनंतर त्यांनी एक वक्तव्य केलं की महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना त्यांच्यामुळे 25 हजार मतं अधिक मिळाली. त्यांनी भुमरेंना मतं मिळवून दिली. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाडलं. आता उद्धव ठाकरे हे राजू शिंदे यांना आपल्या पक्षात घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राजू शिंदेंमुळे माझा पराभव – चंद्रकांत खैरे
पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, राजू शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेत टीका केली आहे. तरीही त्यांच्या पक्षप्रवेश होत आहे. उद्धव ठाकरे हे त्यांचा पक्षप्रवेश करुन घेत आहेत त्यावर माझी हरकत नाही, कारण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबरोबर आहोत. परंतु, कुठलाही नवा माणूस कार्यकर्त्यांच्या मनात रुजवणं अवघड असतं. बाहेरचा माणूस आणायचा आणि कार्यकर्त्यांच्या मनात त्याला स्थान मिळवून द्यायचं हे सोपं नसतं. उद्धव ठाकरेंच्या इच्छेमुळे आम्ही हे सगळं सहन करू. राजू शिंदेंमुळे माझा मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे.” अशी नाराजी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे.