File Photo : Death
राजुरा : राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथे वीज प्रवाहाच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 2) सांयकाळी घडली. करण घनश्याम मुनघाटे (17, रा. पांढरपौनी) असे मृत मुलाचे नाव आहे. पांढरपौनी या गावशिवारात करणच्या वडिलांची शेती आहे. या शेताशेजारी राजेश पांडूरंग गिरसावळे यांची शेती आहे.
हेदेखील वाचा : Ajit Pawar : ‘या’ पोलीस कुटुंबीयांच्या वारसांना 7.5 लाखांची मदत, अजित पवारांनी घेतला निर्णय
करण हा दुपारी आपल्या ज्वारीच्या शेतात गेला असता, राजेश गिरसावळे यांच्या शेतातील तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. याची जाणीव करणला नव्हती. यावेळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तो जागीच मृत्यूमुखी पडला. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विद्युत विभाग व पोलिसांना माहिती दिली. राजुरा पोलिसांनी रात्री पांढरपौनी येथे जाऊन करणचा मृतदेह राजुरा येथील रूग्णालयात शव विच्छेदनासाठी आणला आणि आरोपीवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सकाळी सर्वत्र घटनेची माहिती मिळताच येथे बराच तणाव निर्माण झाला. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास गावकऱ्यांनी विरोध केला. अखेर गावकऱ्यांना शांत केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येऊन उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. राजुरा पोलिसांनी या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवध कलमांतर्गत आरोपी राजेश गिरसावळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक उरकुडे अधिक तपास करत आहेत.
कुंपणाच्या तारेत सोडला वीज प्रवाह
दुसऱ्या एका घटनेत, शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी थेट कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला. पण यामुळे शेतात जागलीला असलेल्या शेतकरी दाम्पत्यालाच जीव गमवावा लागला. विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या दरम्यान घडलेली ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.