छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडले असून येत्या 4 जून रोजी निकाल लागणार आहे. निकालापूर्वी अनेक एक्झिट पोल समोर आले असून यामध्ये एनडीए आघाडी अग्रेसर आहे. राज्यामध्ये निकालाची उत्सुकता असून राज्यातील अनेक मतदारसंघातील लढाई ही प्रतिष्ठेची झाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे संभाजीनगर हा मतदारसंघ आहे. यामध्ये महायुतीकडून संदिपान भुमरे, इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे अशी तिरंगी लढत होत आहे. निकालानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी सर्व उमेदवारांना धाकधूक लागली आहे. निकालापूर्वी चंद्रकांत खैरे यांनी होमहवन करत विजयासाठी 8 तासांची पूजा केली आहे.
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. संभाजीनगरमध्ये लढत चुरशीची झाली असल्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे होमहवन आणि पूजा करताना दिसत आहेत. विजयासाठी चंद्रकांत खैरे देवाला साकडं घालत असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरामध्ये चंद्रकांत खैरे पूजा करत आहेत. खैरे सलग 8 तास होमहवन आणि पूजा करत असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपला विजय व्हावा, यासाठी चंद्रकांत खैरे पूजा आणि होम हवन करत आहेत. सकाळी 11 ते 12 या मुहूर्तावर पूजेला सुरुवात झाली आहे.
2019 ला खैरेंची हार
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ इम्तियाज जलील यांच्याकडे होता. मागील 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना इम्तियाज जलील चुरशीची लढत देत हरवले होते. 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एमआयएमचा उमेदवार निवडून आलेला होता. आता पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील हे रिंगणात आहेत. तरी देखील एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होण्याचे संकेत मिळत आहे.