स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! (Photo Credit- X)
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी जवळपास ९८५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. डिसेंबरमध्ये स्मार्ट सिटीची अधिकृत मुदत संपली असली तरी केंद्र सरकारने मार्चपर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात काही प्रमुख प्रकल्प अद्याप अर्धवटच आहेत.
मिटमिटा येथील सफारी पार्कमधील प्राणिसंग्रहालयाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, वृक्षलागवड, अंतर्गत रस्ते, इतर पूरक सुविधा यांची कामे अद्याप बाकी आहेत. या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे २४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दुसरीकडे, संत तुकाराम नाट्यगृहात रंगमंच व्यवस्था, प्रेक्षक आसन व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा व अंतर्गत सजावटीची कामे प्रलंबित असून त्यासाठी आणखी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीत इमारत उभी असली तरी प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यासाठी वैद्यकीय उपकरणे व डॉक्टर, परिचारिका, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे.
स्मार्ट सिटीमार्फत पूर्ण अथवा अंशतः पूर्ण झालेल्या विकास कामाचे महापालिकेकडे अधिकृत हस्तांतरण अद्याप झालेले नाही. स्मार्ट सिटीची मुदत संपण्यापूर्वीच ही कामे मनपाकडे सुपूर्द होणे अपेक्षित होते. मात्र, ‘काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कोण देणार, यावरून प्रशासकीय संभ्रम निर्माण झाला आहे. काम करणाऱ्या एजन्सींना पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याने, प्रमाणपत्राशिवाय हस्तांतरण स्वीकारण्यास महापालिका अनिच्छुक असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सफारी पार्क व संत तुकाराम नाट्यगृह ही दोन्ही कामे पूर्ण होण्यासाठी अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट सिटीऐवजी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






