सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुरंदर तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या नागरिकांसाठी नेहमीचीच झाली आहे. रस्त्यांची डागडुजी आणि नव्याने रस्ते कामांची मंजुरी म्हणजे ठेकेदार पोसण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची एजंटगिरीच म्हणावे लागेल. कारण कितीही खड्डे बुजवले तरी काही दिवसांत पुन्हा खड्डे उघडे पडत आहेत. तालुक्यातील झेंडेवाडीपासून जाणारा सोनोरी, वनपुरी, एखतपूर, जेजुरी बायपास मार्गावर तर इतके खड्डे आहेत की वाहनचालक या रस्त्यावरून प्रवास करायला नकोच म्हणत आहेत. त्याचबरोबर सासवड, वाघापूर आणि माळशिरस, सासवड ते नारायणपूर, सासवड ते भिवरी, सासवड ते पारगाव अशा सर्वच रस्त्यांवर शेकडो खड्डे पडल्याचे दिसून येतात. सासवड वरून वनपुरीला जाताना जाताना आंबोडी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात आणि मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होवून कित्येक जखमी सुद्धा झाले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
तालुक्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदने तसेच अर्ज, विनंत्या करण्यात आल्या आहेत. प्रसार माध्यमातूनही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र अधिकारी एवढे सुस्तावले आहेत की, त्याकडे लक्ष देण्यास त्यांना कोणतेही स्वरास्थ्य नाही असेच दिसून येत आहे. एवढेच काय पण अधिकाऱ्यांना अनेकवेळा फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून साधा फोनही घेतला जात नाही. केवळ ठेकेदार आणि एजंटांच्या गराड्यात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ कधी मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधी हतबल
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा अधिकाऱ्यांवर मोठा जरब आहे. शिवतारे यांच्यासमोर माहिती देताना अनेकवेळा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सध्या पुरंदर प्रशासनमधील अधिकारी शिवतारे यांना जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत शिवतारे यांना माहिती असून त्यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळा सूचनाही केल्या आहेत, मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता म्हणजे नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे अशीच अवस्था असून, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणे. यामुळे त्यांना कोण गांभीर्याने घेत नसल्याने आमदार विजय शिवतारे प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे हतबल झाले आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार
पुरंदर तालुक्यातील रस्त्यातील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली असून सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनाही न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महादेव खेंगरे सरसावले आहेत. तालुक्यातील सर्व रस्ते येत्या आठ दिवसांत खड्डेमुक्त नाही झाले तर रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.






