"रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक...", FDA च्या कारवाईनंतर श्रीकृष्णा रुग्णालयाचे स्पष्टीकरण
कल्याण : बेकायदेशीरपणे औषधांचा साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने टिटवाळा येथील डॉ. चेतन पाटील यांच्या श्री कृष्णा रुग्णालयावर काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र या कारवाई नंतर या रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती. कारवाई ही चुकीच्या हेतूने तक्रारी करून कारवाई घडवून आणली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता. तसेच मेडिकल स्टोअर्सच्या परवाण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची प्रतिक्रिया डॉ. चेतन पाटील, डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. योगेश कवठे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देतांना डॉ. चेतन पाटील यांनी सांगितले की, २०१७ साली रुग्णालय सुरु केल्यानंतर भागीदारीमध्ये मेडिकल स्टोर सुरु केले होते. यातील भागीदाराने पैशांचा गैरव्यवहार, औषधांचा गैरव्यवहार केल्याने त्यांना रीतसर नोटीस देऊन रुग्णालयातून काढण्यात आले. नवीन परवान्यासाठी अर्ज केला असून, हा परवाना येण्यासाठी वेळ लागत होता. यामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी काही अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती. याविरुद्ध काही लोकांनी खोट्या आणि अनावश्यक तक्रारी करून कारवाई घडवून आणली. याबाबत आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून यामागे संबंधितांची उद्दिष्टे वेगळी असून हे चुकीचे असल्याचे डॉ. चेतन पाटील यांनी सांगितले.
तर मेडिकल स्टोरसाठीची परवाना प्रक्रिया सुरु असून आमचे रुग्णालय हे गावाच्या जवळ असल्याने लहान तसेच वृद्ध रुग्णांची संख्या जास्त असल्याने या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठीच ही औषधे ठेवली होती. एफडीएची कारवाई आम्ही स्वीकारत असून रुग्णालयाची नाहक बदनामी करण्यासाठी काही लोकं गैरकृत्य करत असल्याचे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
टिटवाळ्यात आरोग्य व्यवस्थेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील एका रुग्णालयावर छापा टाकून तब्बल ५.१६ लाख रुपये किमतीची बेकायदेशीर औषधे जप्त केली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील परवानाधारक मेडिकल स्टोअर स्थलांतरित झाल्यानंतरही रुग्णालयाने बेकायदेशीररीत्या औषधांचा साठा ठेवला होता. गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. तपासात ही सर्व औषधे वैध परवाना नसताना साठवण्यात आली होती. जी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो.