देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ज्या प्रकारे फिक्सिंग करण्यात आली त्याच प्रकारे आता बिहारमध्ये केली जाईल अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये भाजप ज्या ज्या ठिकाणी पराभूत होईल त्या ठिकाणी फिक्सिंग ब्ल्यू प्रिंट वापरली जाईल असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ” फिक्स केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विष म्हणून कार्यरत राहतात. एखादा पक्ष फसवणूक करून निवडणूक जिंकत असेल, मात्र त्याने लोकशाही कमकुवत होते. जनतेचा विश्वास देखील कमी होतो.
राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणे, खोटे मतदार उभे करणे याबाबत आरोप केले आहेत. त्यानंतर याबाबतचे पुरावे लपवण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
राहुल गांधी यांनी महाराष्ट विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकार केला आहे. जोवर राहुल गांधी तथ्य समजून घेत नाहीत आणि स्वतः खोटे बोलणे बंद करत नाहीत तोवर त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभ निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दणकून पराभव केला होता. महायुतीने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले. नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला एकत्रपणे ५० पेक्षा जास्त जागा जिंकत्या आलेल्या नाहीत. निकाल लागल्यापासून राहुल गांधी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.
यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये देखील विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेस, भाजप आणि अन्य सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात जसे फिक्सिंग झाले तसेच बिहारमध्ये भाजप पराभूत होईल त्या ठिकाणी करेल असा आरोप करत आहेत. या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.