पुणे : शहरातील वाहतुकीसंदर्भात एकमेकांना पत्र पाठवून सूचना करणारे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी शुक्रवारी एकत्रित रस्त्यावर उतरले. दंडात्मक कारवाई करण्याबराेबरच विनाकारण बॅरेकेटस उभ्या करणाऱ्यांना नाेटीस पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे दाेघेही पुण्यातील वाहतुकीसंदर्भात पत्र व्यवहार करून एकमेकांना सूचना करीत हाेते. यामुळे दाेन्ही यंत्रणा एकमेकांच्या विराेधात उभ्या ठाकल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला हाेता. परंतु शुक्रवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त गुप्ता यांनी संयुक्तपणे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून उपाययाेजना करण्यासंदर्भात निर्णय घेतले. यावेळी पुणे महापािलका, मेट्राे, पीएमआरडीएचे अधिकारी ही उपस्थित हाेते. प्रत्यक्ष पाहणीनंतर संयुक्तपणे काही निर्णय घेतले गेले, सुचनाही संबंधितांना दिल्या गेल्या.
यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सेनापती बापट रस्ता ते पाषाण रस्त्याला जोडणारा मॉडर्न हायस्कूल मधून हलक्या वाहनासाठी पर्यायी रस्ता १५ डिसेबरपर्यत पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रोचे काम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे बेरिकेटिंग ठेवून इतर सर्व ठिकाणचे बेरिकेटिंग जवळ घेण्यात यावे जेणेकरून वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल, अशा सूचना ठेकेदारांना दिल्या.
मेट्रो मार्फत काम चालू नाही व गरज नसताना ज्या ठिकाणी बेरिकेटिंग करण्यात आलेले आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने मेट्रो विभागावर कारवाई का करण्यात येवू नये याबाबत खुलासा मागविण्यात येणार आहे. मेट्रो कामाच्या व्यतिरिक्त खाजगी वाहने, बस, इ. बेरिकेटिंग मध्ये उभी करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणी पडलेले सर्व खड्डे, चैबर्स इत्यादी समपातळीत करण्याची कार्यवाही केली जावी.
नियमाचा भंग करणाऱ्यांकडून दंड वसुल
ज्या ठीकाणी विकास कामे सुरु आहे, अशा रस्त्यांवर तसेच बेरिकेटिंग केलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली असुन, या नियमाचा भंग करणाऱ्यांकडून दंड वसुल केला जाणार आहे. चांदणी चौकातील सर्व्हिस रस्त्याचे काम व उड्डाणपूल अॅप्रोच रस्त्याचे काम पुढील १० दिवसात पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी पुढील ८ महिन्यात चांदणी चौकातील सर्व विकसनाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
नवले पूल परिसरात वाहतुक बेटांची संख्या वाढविण्याची सुचना देण्यात आली. सिंहगड रस्ता उड्डाणपुलाची जागा पाहणी करून तेथे अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणे करण्यात येवू नये, तसेच ठेकेदारास बेरिकेटिंग जवळ घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.