रेल्वे पुलाखालील रस्ता वेगाने पूर्ण करा : आ. समाधान आवताडे
पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या कॉक्रिटीकरण सुरू आहे. त्यासाठी २० दिवस हा व्हीआयपी रस्ता वाहतुकीसाठी बंद करणार आहे. परिणामी, वाहतुकीची कोंडी पाहता आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे अधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याची पाहणी केली व काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी रेल्वे पुलाखालील काम १० दिवसांत करा पूर्ण करा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. तत्पूर्वी आमदार आवताडे यांनी रेल्वे ब्रिज खालील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. याचबरोबर सदर रस्त्याची एक बाजू पूर्ण केली जाणार असून, एका बाजूने दुचाकी व चारचाकी वाहनांना वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या रेल्वे पुलाखालील काँक्रीटीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. यासाठी २० दिवस वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सरगम चौक व टाकळी हा मार्ग देण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे नागरिक व वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
या बैठकीस प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे पुलाखालील काम दहा दिवसांत पूर्ण करा; आमदारांच्या सूचना
रेल्वे प्रशासनाने रेल्वे पुलाखालील काम दहा दिवसांत पूर्ण करावे, अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदार आवताडे यांनी यापुढे पंढरपूर शहरात कोणतेही काम करत असताना येथील नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करावी, अशी सूचना केली.