सतेज पाटील यांनी राज्यात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. निवडणुकीमध्ये महायुती एकतर्फी विजय झाल्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता आला नाही. राज्याचे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर देखील अद्याप विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पूर्वीच दिला आहे. मात्र, सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते ? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला.
पुणे शहर कॉंग्रेसच्या निरीक्षक पदी नेमणूक झाल्यानंतर सतेज पाटील यांनी सोमवारी काँग्रेस भवनमध्ये आजी माजी माजी आमदार, खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, बाळासाहेब मारणे, सौरभ आमराळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सतेज पाटील म्हणाले, “लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. आम्ही नाव देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्यावर निर्णय घेतला जात नाही सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात ? हे आम्हाला कळत नाही. सत्तेसाठी जे कोणी काँग्रेस पक्षाच्या बाहेर जात आहेत, त्यांना आम्ही काय करू शकत नाही. मात्र, जे पक्षात राहतील ते आमचे शिलेदार असतील. आमच्या प्रदेशाध्यक्षांची इच्छा पक्षासाठी वेळ देणाऱ्याना संधी देण्याची आहे,” असे मत त्यांनी मांडले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानुसार भविष्यात संघटनात्मक बदल होतील, असेही ते म्हणाले. महापालिकेत प्रशासक राज येऊन तीन वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. एकाच कामाचे बील महापालिका आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून काढली जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काळात आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासोबतच प्रशासक काळात महापालिकेमध्ये झालेले गैरव्यवहार जनतेसमोर आणू. आगामी निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महा विकास आघाडीच्या माध्यमातून, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आता मात्र आम्ही संघटनात्मक बांधणी आणि सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहार जनतेसमोर आणण्रयावर भर देणार आहोत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दाबून ठेवण्यासारखी नाही. यातील दोषींवर कारवाई व्हावी, ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.