कोल्हापूर / दीपक घाटगे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापुरात (Kolhapur Lok Sabha) झालेल्या प्रचंड गर्दीच्या जाहीर प्रचारसभा, आठ दिवस तळ ठोकून बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी कमाल पातळीवर नेऊन ठेवलेली आणि पणास लावलेली प्रतिष्ठा ही एकूण प्रतिकूल पार्श्वभूमी असताना श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मिळवलेला विजय हा अधिक लखलखीत आहे, असेच म्हणावे लागेल.
लोकसभेवर निवडून जाण्याचे त्यांचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात प्रत्यक्षात उतरले आहे. त्यांच्या या लख्ख विजयाला अनेक घटकांचे हातभार लागलेले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसशिवाय ठाकरे आणि शरद पवार गटाची मते त्यांच्याकडे परावर्तित झाली असल्याने आगामी काळात विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे सुद्धा आता बदलणार आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना तेव्हा व्यासपीठावर असलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी पहिल्यांदा काँग्रेसची सफेद टोपी घातली होती. तेव्हापासून जनतेतून निवडणूक लढवण्याचे त्यांचे स्वप्न होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जाहीरसभा घेतली होती. आणि या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भूषवले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी देण्याची ठरवले होते. पण योग्य संधी त्यांना कधीही मिळाली नव्हती. मात्र, या निवडणुकीत विशेष म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढवून ते पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले आहेत.
मागील या सर्व घटनाक्रमानंतर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण लढा सुरू झाल्यावर अंतरवाली सराटी या गावात जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या लढ्यास समर्थन दिले होते. या दोन घटनांवरून ते लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळाले होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागा ही महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला मिळाल्यामुळे श्रीमंत शाहू छत्रपती यांना काँग्रेसची उमेदवारी घ्यावी लागली. अन्यथा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असते. हे एकमेव असे उमेदवार होते की त्यांना राजवाड्यावर जाऊन महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक यांच्यातील लढत अटीतटीची होईल, असे सुरुवातीपासूनचे वातावरण होते. पण त्यांनी मिळवलेले मताधिक्य पाहता त्यांचा हा मोठा विजय मानला जातो.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी भुदरगड, कागल आणि चंदगड या सहा विधानसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपती यांना मतदारांचे जोरदार समर्थन मिळाले आहे. संजय मंडलिक यांचा कागल हा घरचा मतदारसंघ तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला पण या मतदारसंघात सुद्धा श्रीमंत शाहू छत्रपतींना १ लाख १४ हजार २३, राधानगरी १ लाख ४६ हजार १०७ , कोल्हापूर उत्तर १ लाख ९४६, कोल्हापूर दक्षिण १ लाख २५ हजार ८७३, करवीर १ लाख ५६ हजार ७८०, चंदगड १ लाख ८ हजार ९५४ इतके मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये सर्वात जास्त करवीर त्या पाठोपाठ राधानगरीने मताधिक्य दिले आहे.
भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांची मजबूत शिवसेना फोडल्यानंतर संजय मंडलिक हे ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. त्यांचा हा निर्णय सर्वसामान्य मतदाराला रुचलेला दिसला नाही. याशिवाय त्यांच्याबद्दल या लोकसभा मतदारसंघात एक प्रकारचे नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. पण, त्यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेतली होती. त्यासाठी प्रचारकाळात शेवटच्या काही दिवस त्यांनी कोल्हापुरात मुक्कामच ठोकला होता. शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना प्रचारासाठी कोल्हापुरात आणले होते. पण संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्याचे लोकांना आवडले नाही. लोकांनी आपली नाराजी मतांच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
कोल्हापुरातील अल्पसंख्याक समाज अर्थात मुस्लिम समाज हा छत्रपती घराण्याला मानणारा आहे. मतदानाच्या दिवशी हा समाज मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर पडला होता. या मतदारसंघातील दलित समाज तसेच ख्रिश्चन समाज हा श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या मागे ठामपणे उभा राहिला होता. जरांगे पाटील फॅक्टर अर्थात मराठा समाज, तसेच देशमुख, पाटील, जहागीरदार, इनामदार, सरदार, हा घटक अपेक्षेप्रमाणे छत्रपतींच्या समर्थनासाठी पुढे आला आहे, हे मताच्या आकडेवारीवरून दिसून येते.
श्रीमंत शाहू छत्रपती यांना विजयाच्या मांडवाखाली आणण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, करवीरचे आमदार पी .एन.पाटील यांनी जीवाचे रान केले होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांचा विजय हा सतेज पाटील यांचा विजय असल्याचे मानले जाते. २०१९ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी राजधर्म बाजूला ठेवून शिवसेनेचे संजय मंडलिक यांना अप्रत्यक्ष समर्थन देऊन निवडून आणले होते. आज त्याच संजय मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी सतेज पाटील यांनी आपले राजकीय संघटन कौशल्य पणाला लावले होते. त्यांनी या निवडणुकीत दिलेली टॅगलाईन सत्यात आली आहे.
संजय मंडलिक यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विजयासाठी देव पाण्यात घातले होते. पण तरीही कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूरच्या गादीला मानही दिला आणि मतही दिले. म्हणूनच मोठ्या फरकाने संजय मंडलिक यांचा या लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने पराभव झाला.
जिकडे सतेज तिकडे विजय
गेल्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ अशी टॅगलाईन घेऊन आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या पाठीमागे ताकद उभा केली होती. तर या निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या पाठीमागे ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईनची पुनरावृत्ती करत जिकडे सतेज तिकडे विजय हे परत एकदा दाखवून दिले आहे.