Mahad ST Depot News: महाड एसटी आगारातील ‘शिवशाही’वर प्रवाशांचा संताप; सेवा बंद करण्याची मागणी
Mahad ST Depot News: कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थान असलेल्या महाड एसटी आगारातील शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कालबाह्य व जिर्णावस्थेत गेलेल्या शिवशाही बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, महाडकरांनी या सेवेबाबत तीव्र असंतोष व्यक्त करत ती तातडीने बंद करण्याची मागणी पुढे केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख आगार म्हणून महाड आगार ओळखले जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच पुणे व सातारा या भागांतून येणाऱ्या अनेक एसटी बसेस मुंबईकडे किंवा कोकणात प्रवास करताना महाड येथे थांबतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा या आगारातून होत असते.
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक
दरम्यान, शिवशाही सेवा बंद झाल्यानंतर त्याऐवजी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागून आहे. महाडकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित, वेळेवर आणि सुविधायुक्त पर्याय उपलब्ध होणे हीच सध्याची सर्वांची अपेक्षा आहे. गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. सध्या महाड आगाराकडे दहा शिवशाही बसेस कार्यरत आहेत. या बसेस मुंबई, पुणे आणि बोरिवली मार्गावर धावत आहेत.
मात्र या गाड्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून प्रवासादरम्यान वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडणे, इंजिन बिघाड होणे किंवा बस रस्त्यातच थांबणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रवासात विलंब तर सहन करावाच लागतो, शिवाय अनेकदा बंद पडलेल्या शिवशाहीतून उतरून साध्या लालपरी एसटी बसने पुढील प्रवास करावा लागतो. शिवशाहीचे तिकीट दर तुलनेने जास्त असतानाही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचा आर्थिक तोटा होत आहे. वातानुकूलित सेवा म्हणून घेतलेले तिकीट आणि प्रत्यक्षात मिळणारी सुविधा यात मोठी तफावत असल्याची भावना प्रवाशांत आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ ही सेवा आता नावापुरतीच उरल्याची टीका होत आहे.
Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा
याशिवाय, या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारे आवश्यक सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) वेळेवर उपलब्ध होत नसल्याने देखभाल कामात अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मेकॅनिकल विभागालाही या गाड्यांच्या दुरुस्तीचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक बोजा आणखी वाढून सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.






