सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच पक्षांकडून अंतर्गत बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची एकहाती सत्ता असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांवरही राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सभापती पदांच्या निवडीबाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना तातडीने रवाना व्हावे लागल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीस मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके आणि आमदार शंकर मांडेकर, जिल्हाध्यक्ष संभाजी नाना होळकर उपस्थित होते. गटनेता निवडीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली असून, काही नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र गटनेता ६ तारखेला निश्चित केला जाणार आहे. गटनेता निवडला म्हणजे तोच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, असे बंधन नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गटनेता निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाचाही विचार होऊ शकतो. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ६ तारखेला पुणे जिल्हा बँकेत होणाऱ्या बैठकीत एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या बैठकीत जिल्हा परिषद संदर्भातील ठराव मंजूर करून अधिकृत गट स्थापन करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार
१८ मार्चला पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १८ मार्च २०२६ रोजी पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवड कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्षपदासाठीही अनेक इच्छुक पुढे सरसावले असून पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. तालुकानिहाय प्रतिनिधित्व आणि राजकीय समतोल साधत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अंतिम निर्णयाचा अधिकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारीबाबतचा शेवटचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडूनच होणार आहे.






