जळगाव : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात लोकांना प्रार्थनेसह सत्संगाच्या (Satsang) नावाखाली एकत्रित करुन त्यांचे धर्मपरिवर्तन (Caste Conversion) केलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. या प्रकाराचा विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पर्दाफाश करत याप्रकरणी तीन पुरुष व एक महिलेला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.
कालिका माता चौक परिसरातील मंगलम् लॉन्स येथील एका हॉलमध्ये ग्रामीण भागातील काही समुदायांतील कुटुंबांना प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र आणले होते. आमच्या देवाची प्रार्थना केल्यास तुम्हाला असलेले आजार बरे होत असून, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच देवाची प्रार्थना करण्याची गरज राहणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार हे कुटुंब सकाळपासून प्रार्थनेला उपस्थित झाले होते.
याप्रकारची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी या प्रकाराची खात्री केली. त्यानंतर याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकराबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. धर्मांतरण करणाऱ्या समुदायातील लोकांनी सत्संगासाठी हॉल बुक केला. त्यानंतर बंदिस्त असलेल्या हॉलमध्ये याठिकाणी बोलविलेल्या कुटुंबीयातील सदस्यांकडून ते प्रार्थना करुन घेत होते.
शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाला विविध प्रलोभने देऊन त्यांना याठिकाणी एकत्रित आणले होते. याप्रकरणी कीर्तनकार योगेश दिलीप कोळी यांच्या फिर्यादीवरून सीमा संतोष पाटील (४१), पवन सारसर (२५), राजकुमार हरी शंकर यादव (४७), प्रदीप भालेराव (४९) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.