छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून, हळूहळू हातपाय पसरवण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोना संसर्गाची लागण झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब जिनोम सिक्वेसिंगसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्या दोघांचे अहवाल महानगरपालिकेला प्राप्त झाले असून, त्या दोघांनाही जेएन-१ कोरोना नवीन विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांचा अहवाल आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
दुसरीकडे कोरोना संसर्गाचे नियमित तपासणीत पाच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. केरळ राज्यात कोरोनाचे जेएन-१ व्हायरस आढळून आल्याने संपूर्ण देशात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्ण आढळताच सतर्क होत तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांचे स्वॅब जिनोम सिक्वेसिंगच्या तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेत पाठविले जातात.
सिडको एन-८ मधील आणि नारेगाव मधील दोन रुग्णांमध्ये कोरोना जेएन- १च्या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेकडून मनपाला प्राप्त झाला आहे. कोरोना जेएन १ नवीन विषाणू आढळून आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. मात्र, दोन्ही रुग्ण बरे होऊन घरी पतरल्यानंतर हा अहवाल मिळाल्याने आरोग्य विभागाचे सुटकेचा निःश्वास सोडला असलातरी जेएन-१ चा विषाणू आढळून आल्यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता वाढली आहे.
या भागात निघाले पॉझिटिव्ह
राजूनगर गल्लीनंबर – १ मध्ये ४५ वर्षीय महिला, सिडको एन- ६ मधील संभाजी कॉलनीत ३२ वर्षीय पुरुष, पुंडलीकनगर गल्लीनंबर ५ मधील ३७ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील १४ वर्षीय मुलगा आणि सिडको एन- ६ एमजीएम येथील २८ वर्षीय पुरुष हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.